अहिल्यानगरात शिक्षिकेकडून धर्मांतराचे धडे, चौकशी करण्याची पालकांची मागणी; पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहिल्यानगर शहरातील एका खासगी शिक्षण संस्थेतील मुस्लिम महिला शिक्षिका विद्यार्थ्यांना धर्मांतराबाबतचे धडे देत असून, तिचे इंटरनॅशनल कॉल उघडकीस आले आहेत. त्या महिलेवर फिर्याद दाखल झाली असून, येत्या पाच दिवसांत या शिक्षिकेची चौकशी करून तिला अटक करावी, अन्यथा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पालकांनी दिला आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, दत्ता खैरे, विशाल पवार, डॉ. राहुल मुथा, अनंत शेळके, रमेश गांधी, अमोल देडगावकर, मेहुल शहा, परेश लोढा, दीनेश चोपडा, ओंकार घोलप आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेनेही या महिला शिक्षकांना शाळेमध्ये ठेवू नये, अशा प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल करावे, हा प्रकार गंभीर असून, पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे, अशी मागणी संग्राम जगताप यांनी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील एका खासगी नामांकित शाळेत 9वीमध्ये शिकणाऱया मुलीला शाळेतील नूर मॅडम या मुस्लिम महिला शिक्षिकेने विश्वासात घेऊन जादू टोण्यासारखा प्रकार करून ‘लव जिहाद’ मध्ये अडकविण्याचा केलेला प्रकार समोर आला आहे. या शिक्षिकेने मुलीला विश्वासात घेऊन घरची माहिती मिळवली. दुसऱया दिवशी रॅपर नसलेले चॉकलेट खायला दिले. त्यानंतर मुलीला 23 दिवसानंतर उलटय़ा झाल्या, गुंगी आली आणि त्याच्या दुसऱया दिवसापासून मुलगी मॅडमकडे इस्लामची माहिती घ्यायला लागली, नमाज पढायला शिकवा, अशी मागणी शिक्षिकेकडे करायला लागली, असे निवेदनात म्हटले आहे.

नूर मॅडमने मुलीला इंस्टाग्रामचा आयडी ओपन करून दिला. एका मुस्तकिन तांबोळी नावाच्या मुस्लिम मुलाशी ओळख करून दिली आणि मुलीच्या परवानगी शिवाय तिचा मोबाईल नंबर मुलाला दिला, तुमचे बहीण भावाचे नाते आहे असे मुलीला सांगून त्यांच्यात नातेसंबंध बनवून दिले. काही दिवसानंतर मुलाने तिच्याशी संबंध बनवून तिच्याशी रिलेशनशिपमध्ये आला. इतक्यावरच न थांबता या मुलाने खडीसाखरसारख्या दिसणाऱया गोळय़ा तसेच पॅरासिटेमोलच्या 100 गोळ्या खायला दिल्या. हा प्रकार पालकांना कळल्यानंतर त्यांनी तो उघडकीस आणला, असे निवेदनात म्हटले आहे.

हा गंभीर प्रकार असून, शाळेतील नूर मॅडमची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच हे रॅकेट उघडकीस आणून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.