दत्तक घेताना पालक देताहेत मुलांपेक्षा मुलींना प्राधान्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाइन , पुणे

हिंदुस्थानी समाजात आज मूल दत्तक घेण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे पालक दत्तक घेताना मुलांपेक्षा मुलींना प्राधान्य देताना दिसत आहेत. 2018-19 या वर्षामध्ये दत्तक म्हणून घेतलेल्या 4027 मुलांपैकी 2398 मुली आहेत. केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने (CARA) ही आकडेवारी जाहीर केली आहे.

एकिकडे समाजाता भ्रूणहत्येसारखे गुन्हे घडत असताना हे चित्र आशादायक असल्याचं मत अनेक सेवाभावी संस्थांनी व्यक्त केलं आहे. दत्तक घेण्याची प्रकिया ही संगणकीकृत करण्यात आली असून त्यामुळेही दत्तक घेण्याच्या प्रकियेवर सकारात्मक बदल दिसून आला आहे. मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि अधिकाधिक पारदर्शक व्हावी यासाठी CARAने पुढाकार घेतला आहे.

ही ऑनलाइन प्रक्रिया ‘केंद्रीय दत्तक संसाधन माहिती आणि सेवा’ विभागाद्वारे राबवण्यात येते. या प्रक्रिेयत मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना आपली संपूर्ण माहिती आणि संबंधित कागदपत्रांची यादी ऑनलाइन नोंदवावी लागते. मूल दत्तक घेणारे पालक हे आर्थिक, मानसिक, सामाजिक, शारीरिकदृष्ट्या  सक्षम आहेत की नाहीत हे जाणून घेण्यासाठी काही चाचण्या करण्यात येतात. जर ते पालक सर्व अटींची पूर्तता करून दत्तक घेण्यासाठी पात्र ठरले तर त्यांना वेबसाईटवर सहा मुलांचे फोटो आणि त्याखाली त्यांचे वैद्यकीय इत्यादी तपशील दिले जातात. पालकांनी त्यापैकी एका बालकाची निवड पुढील 48 तासांमध्ये करणं बंधनकारक असतं. पालकांनी मुलाची निवड केल्यानंतर त्यांना एकमेकांसोबत व्यतित करण्यासाठी तब्बल  १५ दिवसांचा कालावधी मिळतो. त्या नंतर जर पालक पाल्याला दत्तक घेण्यास तयार असतील तर संस्था पुढील कायदेशीर तरतुदी पूर्ण करून मुलाचा ताबा पालकांकडे सोपवते.