खासबागच्या कुस्ती आखाडय़ाला वाहनांचा गराडा; कुस्तीप्रेमी, शाहूप्रेमींकडून तीव्र संताप

सामाजिक न्यायक्रांतीचे प्रणेते आणि कोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूंच्या विचारांचे धडे एकीकडे दिले जात असतानाच, दुसरीकडे मात्र त्यांनी निर्माण केलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंची अक्षरशः दुर्दशा होताना पाहावयास मिळत आहे. यापैकी कुस्तीविना ऐतिहासिक खासबाग मैदान निर्मनुष्य होत असतानाच, आता चक्क आखाडय़ाभोवतीच चारचाकी वाहनांचे पार्किंग करून कुस्तीपंढरीचा अवमान करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे कुस्तीशौकीन तसेच शाहूप्रेमींकडून संताप व्यक्त होताच, महापालिका प्रशासनाला भानावर यावे लागले.

छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक व धाडसी निर्णय घेतले. त्याचप्रमाणे कला, क्रीडा परंपरेलाही राजाश्रय दिला. 1912 साली खास रोमप्रमाणे खासबाग कुस्त्यांचे मैदान निर्माण केले. अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाच्या नामांकित मल्लांच्या कुस्तीने हे मैदान जगप्रसिद्ध झाले. गेल्या आठ-दहा वर्षांत नूतनीकरण करून मैदानाची अवकळा दूर करण्यात आली. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून कुस्तीअभावी हे मैदान निर्मनुष्य बनले आहे. याकडे कोणाचेच लक्ष नाही.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात रविवारी झालेल्या एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या चारचाकी वाहनांचे पार्किंग चक्क या ऐतिहासिक आखाडय़ाभोवती केल्याचे दिसून आले. यामुळे कुस्तीप्रेमींतून तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. आजपर्यंत या आखाडा परिसरात कोणाचीही गाडी आणली नाही. मैदानात प्रवेश करणारा प्रत्येकजण पावित्र्य राखत असतानाच पार्किंगचा हा अक्षम्य प्रकार घडला.

मैदानाचे पावित्र्य राखण्याच्या सूचना
महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे पैलवान संग्राम कांबळे यांच्यासह अनेक शाहूप्रेमींनी महापालिकेकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आयुक्त तथा महानगरपालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी याची गांभीर्याने दखल घेतली. वरिष्ठ अधिकाऱयांकडून चौकशी केली असता, ही कर्मचाऱयांची चूक असल्याचे समोर आले. त्यानंतर या मैदानाचे पावित्र्य राखण्याबाबत अधिकारी तसेच संबंधित कर्मचाऱयांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.