
‘कोहिनूर स्क्वेअर’ इमारतीमध्ये दादरकरांना आता सवलतीच्या दरात पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत शिवसेना नेते खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे यांनी पाठपुरावा केला.
मुंबई महापालिकेच्या वतीने दादरच्या कोहिनूर स्क्वेअर या इमारतीत सर्वांसाठी पार्किंगची व्यवस्था करून देण्यात आली आहे. स्थानिकांना या ठिकाणी सवलतीच्या दरात पार्किंग उपलब्ध करून दिली जात होती. मात्र, ही सवलत अचानक काढून घेण्यात आली होती. याचा मोठा फटका स्थानिकांना बसत होता. या पार्श्वभूमीवर माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे, उपशाखाप्रमुख अजय कौसाळे, संदीप पाटील, महाराष्ट्र वितरक सेनेचे सचिव संतोष देवरूखकर यांच्या माध्यमातून पालिकेकडे पाठपुरावा करून निवेदन देण्यात आले होते.
अशी होती सवलत
या पार्किंगमध्ये पालिकेने वाहनतळ उपलब्ध करून देताना महिना 4 हजार 400 शुल्क आकारले जाते. शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत यांनी महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करून ते शुल्क दादरकरांसाठी 1 हजार 50 रुपये करून घेतले होते. परंतु पालिकेने ते रद्द केल्याने 3 हजार 80 रुपये भरावे लागत आहेत.


























































