
धारावीतील एकेकाळच्या डम्पिंग ग्राऊंडवर सरकारकडून उभारण्यात आलेल्या निसर्ग उद्यानाची जागा धारावीचा पुनर्विकासाच्या नावाखाली बळकावता आली नाही. मात्र हेच निसर्ग उद्यान पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या बस ज्या ठिकाणी उभ्या केल्या जात होत्या तीच अर्धा एकरची जागा आता सरकारने अदानीला आंदण दिली आहे. ‘एमएमआरडीए’च्या या जागेवर आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा भाग असलेल्या ‘एसआरए’ने आपले फलक लावले आहेत.
मुंबईत काही वर्षांपूर्वी धारावीतील मिठी नदी काठावर 37 एकर जागेवर डम्पिंग ग्राऊंड होते. कालांतराने या जागेवर कचरा टाकणे बंद करून तिथे मोठ्या कष्टाने नेचर पार्क (निसर्ग उद्यान) फुलवण्यात यश आले. नुसती झाडे नाही, तर झाडांचे विविध प्रकार लावून त्यांचे संवर्धन करण्यात आले. त्यामुळे विविध पक्ष्यांची संख्याही वाढली. बांबूचीही यशस्वी लागवड करण्यात आली. गांडूळ खत इथे तयार केले जाते आणि येणारे पर्यटक ते विकतही घेतात. एमएमआरडीए आणि महाराष्ट्र नेचर पार्क सोसायटीच्या वतीने पार्कमधील विविध औषधी वनस्पती आणि निरनिराळ्या जातींच्या फुलांचे प्रदर्शन भरवण्यात येते. त्यामुळे मुंबईबरोबर राज्य आणि देशविदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने हे निसर्ग उद्यान पाहायला येतात. धारावीसह मुंबईतील निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यात हे निसर्ग उद्यान महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
अदानीच्या लुटालुटीला धारावीकर एकजुटीने उत्तर देतील
सरकारी जमिनी, जागा आणि भूखंड म्हणजे अदानीला सरकारने दिलेली खुली सूट आहे. त्यात आता ही निसर्ग उद्यानाच्या पार्किंगची अर्ध्या एकरची जागाही अदानी ओरबाडून घ्यायला मागेपुढे पाहत नाही, मात्र अदानीच्या लुटालुटीला धारावीकर एकजुटीने उत्तर देतील, असा इशारा धारावी बचाव आंदोलनाचे नेते आणि माजी आमदार बाबूराव माने यांनी दिला आहे.
चारही बाजूने जागा केली बंदिस्त
निसर्ग उद्यानाच्या समोर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या पीएमजीपी कॉलनी आणि बेस्टच्या धारावी डेपोला लागून ‘एमएमआरडीए’ची ही अर्धा एकर जागा आहे. ही जागा पूर्वी पार्किंगसाठी वापरली जात होती, मात्र आता ही जागा पार्किंगसाठी बंद करून चारही बाजूने बंदिस्त करून त्यावर सरकारी फलक लावण्यात आले आहेत.