
टीआरपी घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले बार्कचे माजी सीईओ पार्थो दास गुप्ता यांनी टीआरपीत फेरफार केल्याचे मुंबई पोलिसांकडे पुरावे असून पार्थो इतर चॅनलच्या संपर्कात असल्याचे व्हाट्सएप चॅट उपलब्ध असल्याचा दावा सरकारी वकील शिशिर हिरे यांनी आज हायकोर्टात केला. दरम्यान न्यायालयाने पार्थोच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला.
अर्णब गोस्वामी याच्या रिपब्लिक टीव्हीच्या दर्शकांची संख्या वाढवण्यासाठी लाच स्वीकारत टीआरपी घोटाळा करणाऱया बार्कचे माजी सीईओ पार्थो दास गुप्ता यांना मुंबई क्राईम ब्रँचने 24 डिसेंबर रोजी अटक केली असून जामिनासाठी त्यांनी ऍड. शार्दूल सिंग व ऍड. आबाद पोंडा यांच्या मार्फत हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे.
4 जानेवारी रोजी जामीन अर्ज दंडाधिकारी कोर्टाने फेटाळून लावल्याने पार्थो यांनी सुरुवातीला सुटकेसाठी सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाली. या प्रकरणाच्या तपासासाठी आम्ही सर्व ती काळजी घेतली असून रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी आणि पार्थो हे दोघंही खूप जवळचे मित्र असल्याचे सिद्ध झाले आहे.
पार्थो पोलिसांच्या ताब्यात असताना त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले, सोप्यात सोप्या प्रश्नाचे उत्तरही तो देऊ शकला नाही असे सरकारी वकिलांनी न्यायमूर्तींना सांगितले. दरम्यान पार्थोच्या वकिलांनी मात्र हा दावा फेटाळत जामीन देण्याची मागणी केली.





























































