जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पाथर्डी

तालुक्यातील वाळूंज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत बुधवारी अचानक कोसळली. सुदैवाने ज्या वेळी ही घटना घडली त्या वेळी या भिंतीच्या मागे विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेने नादुरुस्त शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेने पालक वर्गातून मात्र संताप व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील वाळूंज येथे जि.प. ची शाळा असून या शाळेत पहिली ते चौथीचे विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेच्या सहा पत्र्याच्या खोल्या १९८२ साली बांधण्यात आल्या होत्या. या खोल्यांच्या भिंतीला तडे गेले आहेत. गेल्या दीड वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने संबंधित जीर्ण खोल्या पाडून नवीन खोल्या बांधकाम करण्याबाबत ठराव जिल्हा परिषद शिक्षण विभागाला सादर केला होता. तर सहा महिन्यापूर्वी शाळा प्रशासनानेही निरलेखनाचा प्रस्ताव जी.प.कडे पाठवला होता. यावर जी.प. ने कोणतीही कार्यवाही न केल्याने नाईलाजाने विद्यार्थ्यांना धोकादायक शाळेत शिक्षण घेणे भाग पडले आहे. या शाळेत एकूण ५५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . शाळेच्या दक्षिण बाजूच्या दोन खोल्या अत्यंत धोकादायक बनल्याने उरलेल्या चार खोल्यांचा वापर सध्या सुरू आहे. त्या पैकी एका खोलीत मुख्याध्यापकांचे कार्यालय, एका खोलीत पोषण आहाराचे साहित्य तर उरलेल्या दोन खोल्यात शाळा भरवण्यात येत आहे. काही वर्ग शाळेसमोरील मंदिरात भरवण्यात येत होते . मंदिरात धार्मिक कार्यक्रम असतील तेव्हा मात्र सर्वच वर्ग या दोन खोल्यात भरवण्याची वेळ शिक्षकांवर येत असते. शाळेच्या पाठीमागील बाजूला नदी आहे .पाठीमागील भिंतीला गेल्या अनेक वर्षांपासून तडे गेलेले आहेत मात्र पर्याय नसल्याने अशा धोकादायक इमारतीमध्ये मुलांची शाळा सुरू होती.

विशेष म्हणजे बुधवारी सकाळीच काही पालकांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना वर्गात न बसवता मंदिरात बसवण्याची सुचना शिक्षकांना केली .त्याप्रमाणे सर्वच विद्यार्थी शाळेसमोरील मंदिरात बसले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शाळेच्या पश्चिम बाजूच्या दोन खोल्यांची पाठीमागील भिंत कोसळली व उरलेल्या खोल्यांच्या भिंतीला भगदाड पडले . मधल्या सुट्टीत मुले शाळेच्या पाठीमागील मोकळ्या जागेत खेळतात मधली सुट्टी असती तर मोठा अनर्थ झाला असता. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरीही तालुक्यातील अनेक शाळांच्या खोल्या मोडकळीस आल्या असून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जीव धोक्यात घालून या शाळांमध्ये जावे लागत असल्याने तातडीने या शाळांच्या खोल्या जी.प. ने दुरुस्त कराव्यात अशी अपेक्षा पालक वर्गातून होत आहे.