
पाटणाच्या एका सरकारी रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. रुग्णालयाने एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित करुन त्याचे मृत्यूप्रमाणपत्र बनवले. त्यांच्या नातेवाईकांकडे मृतदेहही सोपवला. मात्र मुखाग्नी द्यायला चेहरा उघडल्यावर सगळेच हादरून गेले.
पटना जिल्ह्यातील मोहमदपूर येथील रहिवासी चुन्नू कुमार यांचा डिसेंबर 2020 साली पाय तुटला होता. त्यानंतर त्यांच्यावर घरात उपचार सुरू होते. मात्र 9 एप्रिल रोजी त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना पाटणाच्या पीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याचे सांगितले.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याची कोरोना चाचणी केली त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर चुन्नू कुमार यांना कोरोना वॉर्डमध्ये दाखल केले. त्या वॉर्डमध्ये नातेवाईकांना जाण्यासाठी परवानगी नव्हती. डॉक्टरांनी शनिवारपर्यंत त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे सांगितले. मात्र रविवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले की रुग्णाची स्थिती गंभीर आहे. त्यानंतर तासाभराने त्यांना मृत घोषित केले. घाईगडबडीत मृत्यू प्रमाणपत्र बनवून मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे सोपवला. त्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी करण्यात आली.
चून्नू कुमार यांच्या मुलाने मुखाग्नी देण्याच्यावेळी वडिलांचा चेहरा बघण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा चेहऱ्यावरचा कपडा बाजूला केल्यावर जे पाहिले त्याने साऱ्यांनाच धक्का बसला. ते त्याचे वडील नव्हतेच. दुसरीच व्यक्ती होती. त्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी घाईगडबडीत त्या मृतदेह रुग्णालयात घेऊन गेले आणि त्या मृतदेहाला पोस्टमॉर्टम रुममध्ये ठेवण्यात आले. चून्नू यांचे नातेवाईक जेव्हा कोरोना वॉर्डमध्ये पोहोचले तेव्हा चून्नू व्यवस्थित होते. त्यानंतर संपूर्ण रुग्णालयात हंगामा सुरू झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याबाबत दिलगिरी व्यक्त करत दोषींविरोधात योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन चून्नू यांच्या कुटुंबाला दिले.



























































