1 एप्रिलपासून बीएस 4 च्या गाड्या बाद होणार; वाहननोंदणीसाठी गुढीपाडव्यालाही परिवहन कार्यालय सुरू राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकी चारचाकी वाहनांमुळे होणार्‍या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने बीएस 4 तंत्रज्ञान असलेल्या गाड्यांची 1 एप्रिलपासून नोंदणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पुढे बीएस 6 तंत्रज्ञान असलेल्या गाड्यांची नोंदणी आरटीओ कार्यालयात होणार आहे. बीएस 4 तंत्रज्ञान असलेल्या गाड्यांची नोंदणी करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 असून त्यानंतर बीएस 4 गाड्यांची नोंदणी होणार नाही. त्यानंतर या गाड्या बाद होणार आहेत. 25 तारखेला गुढी पाडवा असल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात गाड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. अशावेळी नव्या गाड्या घेणाऱ्या वाहनांना नोंदणीक्रमांक देऊन त्या वाहन खरेदीदारांना वाहनांचा ताबा लवकरात लवकर मिळावा यासाठी परिवहन कार्यालयाने सुट्टीच्या दिवशीही नवीन वाहनांच्या नोंदणीचे कामकाज होणार असल्याचे पेण परिवहन कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या पत्रकानुसार शनिवारी 21 मार्च, रविवारी 22 मार्च, गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवारी 25 मार्च ,शनिवारी 28 मार्च आणि रविवारी 29 मार्च या दिवशी फक्त नवीन वाहनांच्या नोंदणीचे कामकाज सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नवीन वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना वाहन नोंदणी करण्यासाठी विलंब होणार नाही. तसेच सुट्टीच्या दिवशी कामकाज सुरू राहिल्याने शासकीय महसूल जमा होण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे या संधीचा लाभ वाहन वितरक आणि वाहनधारकांनी घेण्याचे आवाहन पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.