ए-सॅट परीक्षण हा हिंदुस्थानचा हक्क; अंतराळ युद्ध नसल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानने केलेल्या ए-सॅट परीक्षणाबाबत अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्थानच्या भूमिकेचे समर्थन केले असून चीन आणि पाकिस्तानला फटकारले आहे. हिंदुस्थानने केलेल्या ए-सॅट परीक्षणामुळे अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला आहे, असे सांगत चीनने याबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र,हिंदुस्थानने केलेले परीक्षण हा त्यांचा हक्क असून त्यात अयोग्य काहीच नाही. हिंदुस्थानने त्यांच्या हक्काचा वापर केला असून हे अंतराळ युद्ध नसल्याचेही पेंटागॉनने स्पष्ट करत चीन आणि पाकिस्तानला फटकारले आहे. अंतराळातील संभाव्य धोक्याच्या चिंतेतून हिंदुस्थानने अॅन्टी सॅटेलाईट म्हणजेच ए-सॅट परीक्षण केल्याचेही अमेरिकेने स्पष्ट करत हिंदुस्थानच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. 27 मार्चला हिंदुस्थानने एसॅट परीक्षण यशस्वी केले होते. अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे परीक्षण करणारा हिंदुस्थान हा चौथा देश ठरला आहे.

अंतराळातील संभाव्य धोक्यांमुळे हिंदुस्थानला स्वतःची सुरक्षा आणि सामर्थ्य दर्शवण्याची गरज भासल्यानेच त्यांनी हे परीक्षण केल्याचे अमेरिकेच्या स्टॅटेजिक कमांडचे कमांडर जनरल जॉन ई हायटन यांनी सांगितले. हिंदुस्थानने हे परीक्षण का केले असा सवाल एका सिनेटरने विचारला होता. त्यावर हायटन यांनी हे उत्तर दिले. हिंदुस्थानने हे परीक्षण केल्यानंतर नासाने चिंता व्यक्त करत अंतराळात झालेल्या कचऱ्याची समस्या मांडली होती. या परीक्षणानंतर अंतराळात 400 तुकडे पसरले आहेत. त्यातील 24 तुकडे आयएसएसवर फिरत असून ते धोकादायक असल्याचे सांगितले होते. मात्र, हिंदुस्थानने केलेल्या परीक्षणात अंतराळ युद्धाची किंवा स्पर्धेची भावना नसून त्यांनी फक्त सुरक्षेसाठी परीक्षण केल्याचे हायटन यांनी स्पष्ट केले.

अंतराळातील वाढत्या कचऱ्याबाबत आंतरराष्ट्रीय नियम आणण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ते इतर देशांच्या उपग्रहासाठी धोकादायक आहे. त्यामुळे अंतराळात कचरा होणे योग्य नाही. ते टाळण्यासाठी नियम बनवण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. याआधीही चीनने 2007 मध्ये केलेल्या परीक्षणामुळे एक लाख तुकडे निर्माण झाले होते. त्यामुळे अंतराळात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली असून ती सोडवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर 2009 मध्ये अमेरिकेच्या कार्यरत असलेल्या उपग्रहाची रशियाच्या सक्रीय नसलेल्या उपग्रहाशी टक्कर झाली होती. त्यामुळेही अंतराळत कचरा निर्माण झाला होता. या घटनेनंतर अंतराळात उपग्रहांच्या ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होण्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हिंदुस्थान हा अमेरिकेचा सहकारी देश आहे. त्यामुळे त्यांनी केलेल परीक्षण हा चिंतेचा विषय नसून अंतराळातील कचऱ्याची आणि उपग्रहांच्या ट्रॅफिकची समस्या सोडवण्यावर भर देण्याची गरज व्यक्त त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेने हिंदुस्थानच्या एसॅट परीक्षणला पाठिंबा दर्शवल्याने चीन आणि पाकिस्तानला चपराक बसली आहे.