मद्यपी चालकांची संख्या घटली,सात महिन्यांत 8 हजार 885 जणांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात असलेले सीसीटीव्हीचे जाळे आणि पोलिसांच्या नियमित कारवाईमुळे मद्यपी चालकांची संख्या कमी होत चालली आहे. गेल्या सात महिन्यांत वाहतूक पोलिसांनी 8 हजार 885 मद्यपी चालकांवर कारवाई केली आहे. त्यात 35 महिलांचा समावेश आहे.

मुंबईत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाते. खासकरून नशेत गाडी चालवून स्वतःसह इतरांच्या जीवाशी खेळणाऱ्या चालकांविरोधात ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम हाती घेतली जाते. गेल्या सात महिन्यांत वाहतूक पोलिसांनी 8 हजार 885 मद्यपी चालकांवर कारवाई केली. त्यात 35 महिलांचा समावेश आहे, तर गेल्या पाच वर्षांत वाहतूक पोलिसांनी 77 हजार 445 मद्यपी चालकांची झिंग उतरवली आहे. 2016 आणि 2017 मध्ये वाहतूक पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात मद्यपी चालकांवर कारवाई केली होती. कारवाईची मोहीम पुढे चालू ठेवल्यामुळे मुंबईत मद्यपी चालकांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. सण, उत्सव आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला सोडता दारू पिऊन वाहने चालवण्याचे प्रकार कमी होत असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.