बार्शीमध्ये व्यक्तीची नैराश्याच्या गर्तेत आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । औसा 

तालुक्यातील भेटा येथील तरुण आईच्या उपचारासाठी आईला घेऊन बार्शीत गेलेल्या तरुणानी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील भेटा येथील बालाजी सुग्रीव शिंदे (वय ४५) या तरुणाने आपल्या आईला कॅन्सर झाला असल्याने तिला घेऊन गेल्या दीड महिन्यापासून बार्शी येथील कॅन्सर हॉस्पीटल येथे आईला अ‍ॅडमीट करून तेथेच आईच्या आजारवर उपचार सुरू करण्यात आले. पण सोबत राहणार्‍या माणसांची जेवणाची सोय होत नसल्याने दवाखान्याच्या बाजूलाच बालाजी शिंदे यांनी भाड्याने रुम केली. दिवसभर दवाखान्यात थांबायचा आणि रात्री रुमवर आराम करण्यासाठी जायचं. पण गेल्या सहा महिन्यापासून तो नैराश्यमय जीवन जगत होता. गेल्या चार महिन्यापुर्वीच त्यांचे वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तेव्हापासून आईही सतत आजारी पडायची.

आईला कॅन्सर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. वडील अचानक गेल्याने आणि आपल्याजवळ तर फक्त आईच उरली. तिला चांगल्या दवाखान्यात नेऊन उपचार करावे असे स्वप्न उराशी बाळगुन त्याने थेट बार्शी गाठली. पण गेल्या चार – पाच वर्षापासून औसा तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने खर्च परवडणारा तर नव्हताच शिवाय मुला-मुलींचे शिक्षण कसे पूर्ण करावे व कुंटूंबात असलेल्या साडेतीन एकर जमिनीवर काय काय करायचे, बँकेचे असलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून बाशी येथील भाड्याने केलेल्या रुममध्ये शुक्रवारी पंख्याला गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. त्यांच्या पश्चात वयोवृध्द आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.