पत्नीच्या फेसबुकवरून मित्राला जाणीवपूर्वक मेसेज करून मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

स्वतःच्या पत्नीच्या फेसबुक अकाउंटवरून मित्राला मेसेज केले. तसेच त्या मित्राला उलट जाब विचारत त्याच्यावर चाकूने वार केले. हा प्रकार सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास बळीराजा कॉलनी समोरील रोडवर घडला. याप्रकरणी जाणीवपूर्वक मेसेज करून भांडण करणाऱ्या तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

सुनील राजू जाधव (वय 19, रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गिरजेश दशरथ जाधव (वय 27, रा. ज्ञानदीप कॉलनी, रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गिरजेश याने त्याच्या पत्नीच्या फेसबुक अकाऊंटवरून फिर्यादी सुनील यांना ‘मी तुला ओळखते, तू पिंपळे सौदागर मध्ये राहतो, तू सहा महिन्यांपूर्वी मला भेटला होतास. तू बळीराजा कॉलनी जवळ ये’ असा मेसेज केला.

यानंतर सुनील या मेसेजनुसार बळीराजा कॉलनीजवळ पोहोचला. त्यावेळी तिथे असलेल्या आरोपी गिरजेश याने सुनीलला ‘तू माझ्या पत्नीला मेसेज कशाला करतोस’ असा उलट जाब विचारला. तसेच सुनीलला शिवीगाळ करत पोटात, डोक्यावर आणि चेहऱ्यावर चाकूने वार केले. यापुढे इकडे आल्यास मारून टाकून देईन, अशी धमकी देखील दिली. यामध्ये सुनील गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.