
सामना ऑनलाईन । बडोदा
महिलांना अनोळखी क्रमांकांवरून फोन येणं ही कितीही त्रासदायक बाब असली तरीही आता ती सामान्य झाली आहे. पण, कुणी जर एक दोन नाही तर 511 कॉल्स केले तर? बडोद्यातील एका महिलेला एका विकृताने 511 कॉल केले आहेत.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एतल पिल्लई असं या विकृत माणसाचं नाव आहे. ऑक्टोबर 2018मध्ये व्यवसायाने डिस्को जॉकी असलेल्या एतलची भेट पीडितेसोबत झाली होती. एतलने महिलेला त्याचा नंबर देऊन तिच्याकडून तिचा नंबर मागितला होता. डीजे असल्यामुळे कुठली पार्टी असेल तर सांगा, असा बहाणा त्याने त्यासाठी बनवला होता. महिलेकडून तिचा नंबर मिळाल्यानंतर तो तिला वारंवार कॉल करून त्रास देऊ लागला. तिच्याशी प्रेमसंबंध जोडण्याबाबत तो दबाव आणू लागला. महिला विवाहित असल्याने तिने त्याला नकार दिला.
पण, एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही. एतलने तिला धमकवायला सुरुवात केली. तिचा पती ऑफिसला निघून गेल्यानंतर एतल तिच्या घराबाहेर येऊन तिला त्रास देऊ लागला. महिलेने पतीला विश्वासात घेऊन त्याच्यासह एतलला समजवायचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर एतलने तिला नवरा आणि मुलांना जिवे मारण्याची धमकीही दिली. महिला धमक्यांनाही बधत नाही असं पाहून त्याने 23 मार्च रोजी तिच्या फोनवर सलग 511 वेळा कॉल केले. यानंतर मात्र महिलेचा संयम सुटला आणि तिने पोलिसात तक्रार केली.
पोलिसांनी एतल विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सध्या तो फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे आणि लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

























































