
गरीबी आणि महागाईचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा भडका उडणार आहे. सराकारी खजिना भरण्यासाठी करवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत इमरान खान यांच्या सरकारने महागाईचा बॉम्ब फोडण्याची तयारी केली आहे. 16 जानेवारीपासून पाकिस्तानात 1 लिटर पेट्रोलसाठी 150 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.
एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे इमरान सरकार धर्माचा हवाला देत जनतेची दिशाभूल करत आहे. देशाचा खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी सरकारने अनेक वस्तूंवरली करात मोठी वाढ केली आहे. आता महागाई भडकलेली असतानाच त्यात आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही गगनाला भिडणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याचे सांगत पाकिस्तानातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. ही दरवाढ करण्यात आल्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहचणार आहेत. पाकिस्तानमध्ये 1 लिटर पेट्रोलसाठी 150 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे, असे जियो टीव्हीने म्हटले आहे.
पेट्रोलियम पदार्थांच्या उत्पादनात 6 रुपयांची वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. पेट्रोलच्या किमती 5 रुपये तर डिझेलच्या किमती 6 रुपये प्रतीलिटर वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान इमरान खान यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल,असे पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर 16 जानेवारीपासून लागू होणार आहेत.
याआधी पाकिस्तानात 31 डिसेंबरला पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि हाय स्पीड डिझेलमध्ये त्यावेळी 4 रुपये प्रतिलिटर अशी वाढ करण्यात आली होती. तर रॉकेलच्या दरात 3.95 आणि हलक्या दर्जाच्या डिझेलमध्ये 4.15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता 16 जानेवारीपासून नवी दरावाढ लागू झाल्यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहचणार आहेत.






















































