Photo – साठवून ठेवावा असा क्षण…

मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी ठाकरेंची डरकाळी वरळीच्या डोममध्ये घुमली. हा सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांचं पूर्ण कुटुंब सभागृहात उपस्थित होतं. हा क्षण तमाम मराठीजनांसाठी आनंददायी असा होता. ठाकरे बंधूंची दणदणीत आणि खणखणीत भाषणे झाल्यानंतर वेळ होती ती मनात साठवून ठेवावा असा फोटो टिपण्याची. ठाकरे कुटुंबीय व्यासपीठावर आले आणि कॅमेरे सरसावले. पूर्ण कुटुंब पुन्हा एकदा एकाच फ्रेममध्ये आलं. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही या खास क्षणांचे फोटो एक्सवर पोस्ट केले आहेत. मराठीसाठी आणि महाराष्ट्रधर्मासाठी ठाकरे सदैव लढत राहणार, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी या पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी थोपटली राज यांची पाठ

आजच्या मेळाव्यात व्यासपीठावर केवळ दोनच खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोघे तिथे स्थानापन्न झाले. कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही बंधूंची भाषणे झाली. दोघांनीही आपल्या खास ठाकरी शैलीत फटकेबाजी केली. राज ठाकरे यांनी आधी भाषण केले. त्यांचे भाषण झाल्यानंतर ते जागेवर जाऊ बसले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी हात मिळवून त्यांच्या पाठीवर थाप मारली. काहीतरी कानात कुजबुजले. दोघांमध्ये हास्यविनोदही रंगला. उद्धव ठाकरे यांनी नंतर आपल्या भाषणात राज यांच्या भाषणाचे जाहीर कौतुक केले.

आदित्यअमित यांची गळाभेट

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे ही ठाकरे घराण्याची पुढची पिढीही या ऐतिहासिक सोहळ्यात एकत्र आली. सुप्रिया सुळे यांनी अगदी हाताला धरून दोघांनाही व्यासपीठावर मध्यभागी एकत्र आणलं. उद्धव ठाकरे अमित ठाकरे, राज ठाकरे आदित्य ठाकरे यांचा एकत्र फोटो टिपण्याचा योग यावेळी साधला गेला. त्यानंतर गळाभेट घेत वज्रमूठ उंचावत आदित्य अमित यांनी मराठीजनांना अभिवादन केले तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

महाराष्ट्राचे वाघ…

उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी हात उंचावून तमाम मराठी जनतेला अभिवादन केले. या फोटोने महाराष्ट्रात आणि देशात तुफान आणले. ‘महाराष्ट्राचे वाघ’ असे शीर्षक दिलेला हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला. मोबाईलचा डीपी आणि स्टेटसवरही हाच फोटो सर्वत्र पाहायला मिळत होता.

खास दिवस आहे आज

‘खास दिवस आहे आज, एक झाले उद्धव राज’ अशा पोस्टही सोशल मीडियात फिरत होत्या. तर ठाकरे बंधूंची मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी गळाभेट झाली आणि पुन्हा एकदा बुलंद झाला आवाज मराठीचा, मराठी माणसाची एकजूट अखंड राहो! मराठी भाषिक अस्मितेचा विजय असो, अशी शिवसेनेच्या एक्स हँडलवरून केलेली पोस्टही प्रचंड शेअर झाली.

अजित भुरे यांचे ओघवते सूत्रसंचालन

निर्माते-दिग्दर्शक अजित भुरे यांनी ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी केलेला संघर्ष त्यांनी मांडला.

जानकर यांनी भरवला पेढा

मराठीच्या या विजयी सोहळ्याला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरही उपस्थित होते. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा त्यांनाही अत्यानंद झाला. राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर ते पेढे घेऊनच व्यासपीठावर आले. त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना पेढा भरवला. व्यासपीठावरील सर्वांनाच पेढे वाटून आनंद व्यक्त केला. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात जानकर यांचा आवर्जून उल्लेख केला होता. बऱ्याच वर्षांनी महादेवराव आपल्यासोबत आलेत असे सांगत मराठीच्या लढय़ात सामील झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

मराठी एकजुटीची वज्रमूठ

हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करण्यासाठी शिवसेना आणि ‘मनसे’ने पुकारलेल्या मोर्चात कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, तर फक्त मराठीचा अजेंडा असेल, असे जाहीर करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष, संघटना, संस्थांनी मराठीसाठी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे केवळ मोर्चाच्या धसक्याने हिंदीसक्ती रद्द करण्यात आली. त्यामुळे विजयी मेळाव्यातही मराठीसाठी एकजुटीची वज्रमूठ दिसून आली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, कृती समितीचे दीपक पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, शेतकरी नेते अजित नवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.

मराठी विजयी मेळाव्याला आवर्जून उपस्थित असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार जयंत पाटील हे व्यासपीठावर येताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत व्यासपीठावर होते. तिन्ही नेत्यांमध्ये मनमोकळा संवाद रंगला.