
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड व त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड यांनी केलेल्या पक्षांतरावर स्थानिक आदिवासी मतदार अतिशय नाराज झाले आहेत. सलग 35 वर्षे आमदार म्हणून संधी देऊनही तालुक्याचा विकास झाला नाही. आदिवासींचे हृदयसम्राट म्हणून घेताना आदिवासी बांधवांसाठी काय योगदान दिले याचा हिशोब द्या, अशा शब्दांत अकोले मतदारसंघातील मतदार सुनील वसंत भद्रिके यांनी मधुकर पिचड यांना खुले पत्र लिहिले आहे. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील मतदार नव्या चेहर्याला संधी देतील, असे पत्रात नमूद केले आहे.
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मुधकर पिचड व त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षांतरावर नगर जिह्यातल्या अकोले मतदारसंघातील मतदार सुनील वसंत भद्रिके यांनी खुले पत्र लिहिले आहे. यामध्ये आदिवासी मतदारांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अकोले तालुका हा मतदारसंघ आदिवासी (एसटी) राखीव आहे. या मतदारसंघातील मतदारांनी सलग सात वेळा निवडून दिले. 1980 ते 1985पर्यंत काँग्रेस आणि 1999 ते 2009मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आपल्याला तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली, पण या तालुक्याला आपण काय दिले असा जाहीर सवाल भद्रिके यांनी केला आहे.
धरण उशाशी-कोरड घशाशी
अकोले तालुक्याला निसर्गाचे वरदान असतानाही या भागातील महिला पाच किमी अंतरावरून पाण्यासाठी पायपीट करतात. भंडारदारा, निळवंडे, बलठन, अंबित, कोथळे, घोटी, पिपंळगावखांड, देवठान, येसनठाव पळसुंदे अशी धरणे असतानाही तालुक्यात आदिवासी भूमिपुत्रांच्या जमिनीला कवडीमोल भाव देऊन सरकारने आदिवासींना विस्थापित केले. धरणाचे पाणी तालुक्यात न ठेवता दुसर्या तालुक्याला पाठवले. धरण उशाशी व कोरड घशाशी अशी अवस्था तालुक्यात आहे.
वैभव पिचडांवरही नाराजी
आपले चिरंजीव आमदार वैभव पिचड यांच्यावर 2014 मध्ये युवा म्हणून तालुक्यातील मतदारांनी विश्वास टाकला, पण त्यांनीदेखील तुमच्या पावलावर पाऊल ठेवले, अशा शब्दांत भद्रिके यांनी मनातली खदखद व्यक्त केली. विधानसभेत अकोले तालुक्याचे प्रश्न मांडताना वैभव पिचड कधीच दिसले नाहीत याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
अकोले तालुक्यात एकही शासकीय कृषी विद्यापीठ नाही, अत्याधुनिक रुग्णालय नाही. पासपोर्ट केंद्र नाही, आयआयटी कॉलेज नाही, अगस्ती वगळता एकही कारखाना नाही. एमआयडीसी नाही, शासकीय आश्रमशाळांची अवस्था एकदा जाऊन बघा, असे या पत्रात नमूद केले आहे. प्रत्येक रस्त्यावर खड्डे आहेत. आमच्या जीवावर सत्ता उपभोगली, आमचा वापर झाला आम्हाला काय मिळाले, असा थेट सवाल त्यांनी मधुकर पिचड यांना केला आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपमध्ये आल्याचे तुम्ही नमूद केले पण 35 वर्षे सत्तेवर असताना मतदारसंघाचा काय विकास केला याचे उत्तर मतदारांना हवे, अशा शब्दांत भद्रिके यांनी जाब विचारला आहे. आम्ही जे हवे ते पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत. पण हे बोलण्याची वेळ आपल्या मतदारांवर का आली याचे आपण आत्मपरिक्षण कराल, अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त केली आहे.
























































