
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेडच्या किनवट तालुक्यासह सीमावर्ती भागात आणि तेलंगणा परिसरात रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे किनवट रस्त्यावरील कोठारी नाल्याला पूर आला. अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात नाल्यावरील पुलावरून जाणारी एक बोलेरो पीकअप गाडी वाहून गेली. मात्र दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत वाहनचालक गंगासिंग पडवाळ सुदैवाने बचावला आहे.
रविवारी पहाटे किनवट परिसरातील पोतरेड्डी, रामपूर, पाटोदासह सीमावर्ती भागातील तेलंगाणा राज्यातील बजार हातनूर, सोनाळा परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे किनवट रस्त्यावरील कोठारी नाल्याला अचानक मोठा पूर आला. या पुराच्या पाण्यामध्ये नागसवाडी येथील प्रताप पडवाळ यांची बोरेलो पीकअप गाडी वाहून गेली. मात्र गाडी चालक गंगासिंग पडवाळ याने वेळीच प्रसंगावधान राखत पोहत पाण्याबाहेर सुखरूप निघाला. सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे.
दरम्यान, कोठारी नाल्यावरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला, तरी नाल्यावर पाणी येऊन वाहतूक बंद होते. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
































































