मुसाफिरखाना इमारतीच्या विक्रीचा मार्ग मोकळा

224

भेंडीबाजार येथील मुसाफिरखाना या पाच मजली इमारतीची विक्री करण्यात येऊ नये यासाठी हायकोर्टात धाव घेतलेल्या गाळेधारकांना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिलासा देण्यास नकार दिला. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुसाफिरखाना इमारतीच्या विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.

पाकमोडिया स्ट्रीटवर मुसाफिरखाना ही इमारत आहे. या इमारतीमध्ये एक प्रार्थनास्थळ असून सुमारे 32 सदनिका आणि काही गाळे आहेत. हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखाना ट्रस्टच्या माध्यमातून येथील रहिवाशांनी हायकोर्टात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. संबंधित मालमत्ता ही वक्फ बोर्डाची आहे आणि वक्फ मंडळाची मालमत्ता विकता येणार नाही, असा दावा करत नियमांचे उल्लंघन करून सदर इमारतीची विक्री करण्यात आल्याचे मुसाफिरखाना ट्रस्टच्या वतीने कोर्टाला सांगितले. सदर इमारत सैफी बुऱहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने खरेदी केली असून महापालिकेच्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्टनुसार ही मालमत्ता ट्रस्टकडे आलेली आहे. तसेच या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी खंडपीठाने निकालपत्र जाहीर करताना गाळेधारकांना दिलासा देण्यास नकार दिला व सदर मालमत्ता वक्फ बोर्डाची नसल्याचे स्पष्ट करत त्यांची मागणी फेटाळून लावली.

आपली प्रतिक्रिया द्या