पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवड शहर खड्यात; विविध भागात 508 खड्डे

पिंपरी-चिंचवड शहर पावसामुळे विविध भागात तब्बल 508 खड्डे पडले, तर पावसाळ्यापूर्वी 855 असे एकूण 1356 खड्डे शहरात आढळले. त्यापैकी 848 खड्डे बुजविले असून 508 खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच खड्यात गेले आहे. मे मध्ये झालेल्या पावसाळ्यातील चार महिने वगळता शहरातील विविध भागात जलवाहिनी, गॅसवाहिनी, प्रकल्पांसाठी रस्ते खोदाई केली जाते. रस्ते खोदाईसाठी १५ मे अखेरपर्यंत महापालिकेची मुदत होती. मुदतीनंतर रस्ते खोदाई केल्यास दंड आणि गुन्हे दाखल करण्याचा महापालिकेने इशारा दिला होता. मात्र, अत्यावश्यक बाब म्हणून पावसाळ्यातही रस्ते खोदाई केली जात आहे. त्यामुळेच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहर खड्यात गेल्याचे चित्र दिसून आले.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ८५५ खड्डे आढळले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे सात ते आठ दिवस अधून-मधून पाऊस पडत होता. या पावसामुळे पुनावळे, रावेत, निगडी, एमआयडीसी परिसर, इंद्रायणीनगरसह विविध भागातील रस्त्यांवर तब्बल ५०१ खड्डे पडल्याचे पाहणीत समोर आले. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना खड्यातून वाट काढावी लागत आहे. खड्याच्या बाजूला खडीवर वाहने घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत. एकूण पडलेल्या १३५६ खड्यांपैकी ८४८ खड्डे बुजविल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामध्ये डांबर आणि कोल्ड मिक्सने ४४४, बीबीएमने म्हणजे खडीने ३६, पेव्हिंग ब्लॉकने २८८, सिमेंट काँक्रीटने ४२ असे ८४८ खड्डे पूर्णतः बुजविले असून, फक्त ५०८ खड्डे बुजवायचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. पाऊस कमी झाल्याने खड्डे बुजविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

यंदापासून सुरू करण्यात आलेल्या पॉटहोल मॅनेजमेंट या अॅपमध्ये खड्यांची नोंद होत आहे. एखाद्या रस्त्यावर पुन्हा खड्डा पडल्यास अॅपमध्ये दिसेल. त्यामुळे एका ठिकाणी दोनदा खड्डा पडल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदारावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. रस्त्याच्या किरकोळ कामाला एक वर्ष, डांबरी रस्त्याला तीन आणि सिमेंटच्या रस्त्याला पाच वर्षे दोष दायित्व निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडल्यास ते संबंधितांकडून बुजवून घेण्यात येणार आहेत.
मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका.