पैसे टाकताच सात मिनिटांत गरमागरम पिझ्झा रेडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई सेंट्रल स्थानकात आता रेल्वे प्रवाशांना पैसे टाकताच गरमागरम पिझ्झा मिळणार आहे. ‘आयआरसीटीसी’ने नवीन योजनेअंतर्गत रेल्वे प्रवाशांना स्वच्छ आहार पुरविण्यासाठी पिझ्झा वेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय घेतला असून पहिले मशीन पश्चिम रेल्वेमार्गावरील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात या महिनाअखेर बसविण्यात येणार आहे.

‘आयआरसीटीसी’ या रेल्वेचे कॅटरिंगची सेवा सांभाळणाऱया कंपनीने पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर पिझ्झा वेंडिंग मशीन बसविण्याचे ठरविले आहे. या मशीनमध्ये पैसे टाकताच सात मिनिटांत गरमागरम पिझ्झा खाण्यासाठी तयार मिळणार आहे. कॅशबरोबरच डेबिट आणि क्रेडिट कार्डाने पेमेंट करण्याचाही पर्याय देण्याचा विचार सुरू असल्याचे ‘आयआरसीटीसी’चे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावाला यांनी सांगितले. ७० ते २५० रुपयांपर्यंचे पिझ्झाचे विविध प्रकार प्रवाशांना अगदी गरमागरम खायला मिळणार आहेत. बंगळुरू येथे नुकतेच रेल्वेने ज्युस वेंडिंग मशीन यशस्वीरीत्या बसविले आहे. या मशीनमध्ये वेजेटेरियन आणि नॉन वेजेटेरियन असा दोन्ही प्रकारचा पिझ्झा मिळणार आहे. पिझ्झा बेकिंग करण्यापासून ते त्यावरील सर्व खाद्यपदार्थांचे डिझाईन करण्याचे काम मशीनद्वारे केले जाणार असून त्यासाठी सात मिनिटांचा अवधी मशीन घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.