10 वर्षीय मुलीच्या मृत्यूचे गूढ वाढले, शौचालयात सापडला होता मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमध्ये एका 10 वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचे गूढ वाढत चालले आहे. घराच्या शौचालयात या मुलीचा देह सापडला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बुधवारी रात्रीची ही घटना असून प्रतिक्षा कुमारी नावाच्या या मुलीचा मृत्यू नेमका झाला कसा हे अजूनही कळालेलं नाहीये.

शिशू मंदिर शाळेत शिकणारी प्रतिक्षा ही घरातील शौचालयात निपचित पडलेली आढळून आली होती. तिच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये म्हटलंय की त्यांची मुलगी रात्री 9.30 च्या सुमारास शौचालयात गेली होती. 15 मिनिटे होऊन गेल्यानंतरही ती परत न आल्याने दरवाजा ठोठावण्यात आला. आतून काहीच प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करावा लागला. ‘दरवाजा तोडून आतमध्ये गेलो तेव्हा शौचालयामध्ये प्रतिक्षा निपचित पडलेली होती’ असं तिच्या आईने म्हटलं आहे.

गुरुवारी या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र एका स्थानिक दुकानदाराने पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन केला आणि मुलीच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली. यानंतर पोलीस उपायुक्त बलकार सिंग घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी प्रतिक्षाचा मृतदेह ताब्यात घेतला. जिल्हा सामान्य रुग्णालयात मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले आणि नंतर मृतदेह परत तिच्या कुटुंबियांच्या हवाली करण्यात आला. संध्याकाळी प्रतिक्षाच्या कुटुंबियांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

शवविच्छेदनाचा अहवाल अजून प्राप्त व्हायचा आहे. प्रतिक्षाच्या वडिलांनी पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की प्रतिक्षाने आत्महत्या केली होती. शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत काहीच सांगता येणार नाही, तो प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.