सीडीएस बिपीन रावत सर्वोत्तम सैनिक आणि देशभक्त होते – पंतप्रधान नरेंद्र मोदी

तामिळनाडूमध्ये झालेल्या लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाबाबत देशभरातून दुःख व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवरांनी रावत यांच्या निधानाबाबत शोक व्यक्त केला आहे.

या दुर्घटनेने आपण दुःखी आहोत. या अपघातात आपण सीडीएस बिपीन रावत आणि अन्य सैनिकांना गमावले आहे. बिपीन रावत हे सर्वोत्तम सैनिक होते. ते सच्चे देशभक्त होते. त्यांनी सर्वतोपरी देशाची सेवा केली. आपण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधआन नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

आजचा दिवस दुर्दैवी आहे. आपण बहादूर सैनिक गमावला आहे. त्यांनी समर्पणाच्या भआवनेतून देशसेवा केली. त्यांचे लष्करातील योगदान आणि त्यांची कटिबद्धता याचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. त्यांच्या निधनाने आपल्याला खूप दुःख झाले आहे. रावत आणि या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचा कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशा शब्दांत गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच अपघातात जखमी झालेले कॅप्टन वरुण सिंह लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

या दुर्घटनेने आपल्याला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या निधनाने देशाची कधीही भरुन न निघणारी हानी झाली आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेबाबत राजनाथ सिंह गुरुवारी संसदेत माहिती देणार आहेत.