मोदींचा बांगलादेश दौरा रद्द; दिल्ली हिंसाचारावरून हजारो लोकांचा विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर नियोजित बांगलादेश दौरा रद्द करावा लागला आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या मुद्दय़ावरून बांगलादेशातील हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून मोदींच्या दौऱयाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर कोरोनाच्या फैलावाचे कारण देत मोदींनी बांगलादेश दौरा रद्द केला आहे.

‘बांगलादेशचे राष्ट्रपिता’ अशी ओळख असलेल्या शेख मुजीबुर्रहमान यांची पुढील महिन्यात शंभरावी जयंती आहे. यासंबंधित कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण धाडण्यात आले होते. यावर तीक्र आक्षेप नोंदवत बांगलादेशातील हजारो लोक रस्त्यावर उतरले. मोदींचा बांगलादेश दौरा रद्द करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली. पंतप्रधान मोदी हे 17 मार्चला बांगलादेश दौऱयावर जाणार होते. तेथील जनक्षोभ कायम असतानाच पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशातील कोरोना विषाणूच्या फैलावाचे कारण पुढे करीत नियोजित बांगलादेश दौरा रद्द केला आहे.

हिंदुस्थान कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बांगलादेशसोबत काम करण्यास तयार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. याशिवाय सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत (एनआरसी) असलेली चिंता दूर करण्याचाही प्रयत्न पंतप्रधान मोदी करू शकले असते, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.