
संपूर्ण देश कोरोनाविरुध्द लढत आहे. बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे. महत्त्वाची कामे ठप्प पडली आहेत. पण देशाचे नेतृत्व करणाऱया पंतप्रधानांच्या घराचे बांधकाम मात्र बिनदिक्कत सुरू आहे. या घरासाठी पर्यावरणासंबंधी सर्व मंजुऱया मिळाल्या आहेत आणि विशेष म्हणजे हे बांधकाम ‘अत्यावश्यक सेवा’ अधिनियमात समाविष्ट केले गेल्याने ते कुणीही रोखू शकत नाही.
कोरोनामुळे देशातील अनेक राज्यांना निर्बंध लावावे लागले. तेथील व्यवहार ठप्प पडले आहेत. पण पंतप्रधानांचे नवे घर असलेल्या ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’चे बांधकाम सुरूच आहे. विरोधी पक्षाने त्यावर आक्षेप घेतला होता. परंतु त्यानंतरही केंद्र सरकारने त्याला हिरवा कंदील दिला. या प्रकल्पांतर्गत पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानासह त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विशेष सुरक्षा पथकाचे मुख्यालय तसेच उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानाचाही समावेश आहे.
15 एकर जमिनीवर नवे पंतप्रधान निवास
सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टवर 13 हजार 450 कोटी रुपये खर्च होणार आहे. त्या प्रकल्पामुळे 46 हजार रोजगारांचीही निर्मिती होईल असा दावा करण्यात आला आहे. पंतप्रधानांचे नवे निवासस्थान 15 एकर जमिनीवर असेल आणि त्यात दहा चारमजली इमारती असतील. शास्त्री भवन, उद्योग भवन, निर्माण भवन, कृषि भवन या इमारती पाडून एक संयुक्त केंद्रीय सचिवालयही उभारले जाणार आहे.





























































