हिंदुस्थानी चहाला जगभरात बदनाम करण्याचा कट; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचणाऱ्यांची पातळी एवढी खाली गेली आहे की त्यांनी चहालाही सोडलेले नाही. हिंदुस्थानी चहाला जगभरात ओळख आहे, ती पुसून टाकण्यासाठी बदनाम करण्यासाठी कट आखला जात असून त्याची काही कगदपत्र समोर आली असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

आसाममधील सात हजार सातशे कोटी रुपयांच्या असोम माला प्रकल्पाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. आज जेव्हा मी आसामच्या चहा कामगारांबाबत बोलत आहे, तेव्हा देशाविरोधात सुरु असलेल्या षडयंत्राबाबतही बोलू इच्छित असल्याचे सांगितले. देशाला बदनाम करण्यासाठी कारस्थान करणारे एवढय़ा खालीच्या पातळीवर गेले आहेत ते चहालाही सोडत नाहीत.

तुम्ही बातम्यांमध्ये एकले असेल, हे कारस्थान रचणारे म्हणत आहेत की हिंदुस्थानी चहाच्या प्रतिमेला बदनाम करायचे, हल्ले करायचे आहेत, त्यासाठी योजनाबद्धरित्या काम सुरू असल्याची कागदपत्र समोर आली आहेत. याबाबत गप्प बसणारे लोक तुम्हाला मान्य आहेत का, हल्ले करणाऱ्यांची स्तुती करणारी लोक तुम्हाला मान्य आहेत का, प्रत्येकाला उत्तर द्यावे लागेल. आज जे राजकीय पक्ष गप्प बसले आहेत, त्यांना प्रत्येक चहा बागायतदार, चहा पिणारा उत्तर मागेल असे नरेंद्र मोदी यांनी बजावले.

ममतांना ‘राम कार्ड’ दाखवणार!
पंतप्रधान मोदी संध्याकाळी पश्चिम बंगालच्या हल्दियामध्ये पोहोचले. तेथे त्यांनी फुटबॉलच्या भाषेत जनतेला संबोधित केले. ते म्हणाले, ममतांच्या तृणमूल काँग्रेसने अनेक फाऊल केले आहेत. म्हणून त्यांना येथील जनता ‘राम कार्ड’ दाखवणार आहे. ‘बुआ आणि भतिजा’ वाद संपुष्टात येणार आहे. बंगालमधील जनतेला ‘ममता’ची अपेक्षा होती, पण ती ‘निर्ममता’ची शिकार झाली असेही मोदी म्हणाले.