कोरोना महामारीत योगा ‘आशेचा किरण’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत असताना योगा हा आशेचा किरण आहे. या कठीण काळात योगा हा आत्मबलाचा एक मोठा स्रोत बनला आहे. संकटात लोकांनी योगाकडे पाठ फिरवली नाही. उलट लोकांमध्ये योगा करण्याचा उत्साह आणि योगावरील प्रेम वाढले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त देशवासीयांशी संवाद साधला.

ज्यावेळी कोरोनाच्या अदृश्य विषाणूने संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा वाजवली होती त्यावेळी कोणताही देश साधनांनी, सामर्थ्याने आणि मानसिकदृष्टय़ा तयार झालेला नव्हता. अशा प्रतिकूल, कठीण परिस्थितीत योगा हाच आत्मबल वाढवणारा एक मोठा माध्यम बनला. योगा आपल्याला तणावातून सामर्थ्याकडे आणि नकारात्मकतून कल्पकतेकडे जाणारा रस्ता दाखवतो, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. आता जगाला ‘एम-योगा’ अॅपची ताकद मिळणार आहे. या अॅपमध्ये कॉमन योगा प्रोटोकॉलच्या आधारे योगा प्रशिक्षणाचे अनेक व्हिडीओज् जगभरातील विविध भाषांमध्ये उपलब्ध असतील, असे पंतप्रधान मोदी यांनी या वेळी जाहीर केले.