मोदी पुन्हा म्हणाले, संकट खूप मोठे! नोएडा येथे देशातील सर्वात मोठ्या विमानतळाचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायल-अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. मात्र, आपल्याला शांत मनाने, धैर्याने, एकजुटीने या संकटाचा सामना करायचा आहे. हे संपूर्ण जगाला त्रास देणारे संकट आहे. 140 कोटी जनतेने या संकटाला एकजुटीने सामोरे जाण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील जेवर येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते. हे सध्या भारतातील सर्वात मोठे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ आहे. सर्व चार टप्पे पूर्ण झाल्यावर हे आशियातील सर्वात मोठे विमानतळ बनेल. उद्घाटननंतर पंतप्रधान म्हणाले की, पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू आहे. यामुळे अनेक देशांमध्ये संकट निर्माण झाले आहे. हिंदुस्थान या भागातून मोठय़ा प्रमाणात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू आयात करतो. सामान्य कुटुंब आणि आपल्या शेतकरी बांधवांवर ओझे पडू नये यासाठी सरकार पावले उचलत आहे. हिंदुस्थानदेखील आपल्या देशवासीयांच्या बळावर पूर्ण शक्तीने या संकटाचा सामना करत आहे, असे मोदी म्हणाले.

  • नोएडा विमानतळावर पहिल्या टप्प्यात 3,300 एकरमध्ये टर्मिनल आणि धावपट्टी बांधण्यात आली आहे. एका धावपट्टीसह या टर्मिनलची वार्षिक क्षमता तीन कोटी प्रवाशांना हाताळण्याची असेल. यासाठी सुमारे 11 हजार कोटी रुपये खर्च आला आहे. वर्ष 2040 पर्यंत विमातनळाचे काम पूर्ण होण्याची मुदत आहे.

जे देशाच्या हिताचे, तेच हिंदुस्थानचे धोरण

जे हिंदुस्थानी जनतेच्या आणि हिंदुस्थानच्या हिताचे आहे तेच हिंदुस्थान सरकारचे धोरण आणि मुत्सद्देगिरी आहे. राजकारणासाठी चुकीची वक्तव्ये तात्पुरते फायदे देतील. मात्र, संकटाच्या काळात अशा गोष्टी बोलणे टाळा, ज्या देशासाठी हानिकारक आहेत. देशाला नुकसान पोहोचवणाऱ्या कृतींना देशाची जनता कधीही माफ करणार नाही. खोटे बोलणाऱयांना जनतेने निवडणुकीच्या काळात अशा राजकारणाला धुडकावून लावले, असे मोदी म्हणाले.