
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणातील जामिनावर सुटलेल्या आरोपीने पुन्हा पीडितेस त्रास देण्यास सुरुवात केल्याने पीडितेच्या अर्जाची दखल घेत विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी आरोपीचा जामीन अर्ज रद्द करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. माउली उर्फ ज्ञानदेव बापू धायगुडे (राक्षसवाडी, ता. कर्जत) असे आरोपीचे नाव आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी धायगुडे याच्याविरोधात कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल आहे. आरोपी धायगुडे हा सध्या जामिनावर होता. मात्र, तो पीडितेच्या घराजवळ राहत असल्याने जामीन मंजूर झाल्यापासून तो पीडितेच्या मोबाईलवर अश्लिल भाषेत मेसेज करणे, तिला भेटायला बोलावणे तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी देत होता. त्यामुळे पीडितेने न्यायालयात लेखी अर्ज दिला होता. त्यानुसार न्यायालयाने आरोपीच्या वकिलांचे म्हणणे मागवले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने धायगुडेचा जामीन रद्द करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. आरोपीचा मोबाईल जप्त करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. पीडितेकडून विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले.























































