
>> दाजी पणशीकर
संजीव कोकीळ यांचा ‘खाकी गुलाब’ हा पहिलावहिला कवितासंग्रह आणि अल्बम प्रकाशित होत आहे. यातील सर्व रचना या विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या आहेत. आषाढी एकादशीनिमित्त या काव्याचा रसग्रहण करणारा लेख.
स्फूर्ती ही अशी एक निराकार चीज असते की, जी कोणाला केव्हा, कुठे प्राप्त होऊन प्रसन्न होईल ते कोणाला सांगता येणार नाही! स्फूर्तीकडे जात-पात, स्त्री-पुरुष-लहान-मोठा हा भेदभाव नसतो! ती येते तेव्हा सर्वांगाने येते आणि रूसून बसते तेव्हा सर्वांशाने अडून बसते! आयुष्यातील ३५ वर्षे पोलीस खात्यात इमानदारीने सेवा केलेल्या संजीव कोकीळ यांना या स्फूर्तींचा, त्यातही कवित्व स्फूर्तीचा ‘अमृतस्पर्श’ होण्याचे वास्तविक काही कारण नव्हते! किंवा त्यांचे नाव मी कधी कोणत्या कवीसंमेलनात सहभागी झाल्याचेही ऐकले नव्हते! त्यांच्या मागील पिढीतही कोणी कवी-महाकवी झाल्याचे कोकीळ यांनीही ऐकले नसेल! साहित्याची, लेखनाची, कवित्वाची अशी कोणतीही पार्श्वभूमी नसता कोकीळ यांना काव्यस्फूर्ती व्हावी, त्यातून ‘खाकी गुलाब’ हा त्यांचा पहिला वहिला कविता संग्रह प्रकाशित व्हावा, हे सर्व त्या स्फूर्तीचे विलसित दिसते आहे!
संजीव कोकीळ हे आता सेवेतून निवृत्त असले तरी कधीही स्वस्थ न बसणारे ‘अ-स्वस्थ’ व ‘प्रवृत्त’ गृहस्थ आहेत! सतत कार्यरत राहणे हा त्यांचा स्थायिभाव! आधी त्यांनी ‘खाकी गुलाब’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आणि त्या गुलाबाच्या आता पाकळी पाकळीतून काव्यसुगंध दरवळू पाहतोय! आता त्यांनी अभंग, पदे अशा रचना शब्दबद्ध केल्या आहेत! या रचनाही उत्तम गायकांकडून गाऊन घेऊन त्या संगीतमय रचनांची ‘सीडी’च कोकीळ यांनी प्रकाशित केली! हीच त्यांची सततची प्रवृत्ती!
कोकीळ यांच्या या ज्या सहा रचना आहेत त्या केवळ उत्स्फूर्त आहेत. त्यामध्ये कवीचे प्रांजळ मन निर्मळपणे प्रकट झाले आहे. साधेपणा हीच या रचनांची शक्ती असते. तो साधेपणा बहिरंगी आहे की, अंतरंगी आहे हे महत्त्वाचे असते. अक्षरांची जुळवाजुळव करून केलेली कविता जशी जाणकारांच्या लक्षात येते, तशीच सहजपणे छंदोबद्ध रचनाही रसिकाला नेमकेपणाने समजून येते! त्या अर्थाने मला या सहा रचना अधिक आपलेपणाच्या वाटल्या.
रूढार्थाने कोकीळ हे मराठी काव्यप्रांतातील कवी नव्हेत. निदान अजून तरी त्यांची कवी म्हणून फारशी कुठे नोंद झालेली ऐकिवात नाही. अशा नवोदितांच्या रचनांची दखल घेताना त्यात काव्यशास्त्र्दृाष्टय़ा फार मोठय़ा गुणवत्तेची अपेक्षा करणे अन्यायाचे ठरेल. अशा प्राथमिक अवस्थेतील रचना या प्राधान्याने ‘बाळबोध’ स्वरूपाच्या असणे स्वाभाविक असले तरी याच पायरीवरूनच कोणाही कवीला पुढच्या पायरीवर पाऊल टाकायचे असते, हे विसरून चालत नाही म्हणूनच कोकीळ यांच्या या गुलाबाच्या पाकळीतून ‘गहनगूढ’ असा काव्यानंद शोधत न बसता, या पाकळय़ा निर्मळ आहेत ना? त्या कुठे विस्कटलेल्या नाहीत ना? या पाकळीचे मूळ ‘सकस’ व ‘रसपूर्ण’ आहे ना, एवढेच पाहायचे असते! कोकीळ यांच्या सहाही रचना या निकषावर उत्तीर्ण होऊ शकतात, असे माझे मत आहे!
‘‘हरि तुझे दर्शन झाले।’ हा अभंगही छान जमून आला आहे. ‘विठ्ठल-रखुमाई’ या रचनेतूनही कवीची सामाजिक सौभाग्याची कामना अधोरेखित होत राहते. विठ्ठल-रखुमाईवर भार घालणाऱ्या भक्ताची आर्तता, भावगंध या अभंगातून जाणवत राहतो. कवीला येथे अजून खूप काही सांगायचे आहे, असे वाटून जाते. ‘विठ्ठल-रखुमाई’ या अभंगातील तिसऱ्या कडव्यातील पहिली ओळ अशी आहे –
‘‘तुका पास झाला वैकुंठास जाई।’’
येथे ‘पास’ हा शब्द येताच प्रथम मी थबकलोच! कारण ‘पास’ हा ‘आपला’ शब्द नव्हे! कोकीळ यांनीही तो इंग्रजीप्रेमापोटी वापरलेला नसावा. ‘पास’ हा परकी शब्द येथे अगदी सहज येऊन गेला! विचार केल्यावर मग लक्षात आले की, असे किती तरी इंग्रजी शब्द मराठी भाषेने पचवले आहेत! सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या सर्वांच्या बोलण्यातून असे असंख्य इंग्रजी शब्द कसे अगदी मराठीचा परिवेष धारण करून ताठ मानेने, मराठीच्या मांडीला मांडी लावून पंगतीत रांगेने बसलेले दिसतात! आता तर पुस्तकांची, नाटकांची, एकांकिकांची नावेही इंग्रजाळलेली येऊ लागली आहेत! हे ‘परकी आक्रमण’ मराठी भाषेला धोकादायक ठरू शकते. म्हणून तशी येथे नोंद घेतली आहे. ‘सांग विठ्ठला’ ही रचना मन वेधून घेते. पंढरपुरात पांडुरंगाच्या मंदिरात पांडुरंग-विठ्ठल एकटाच उभा आहे! त्याच्या डाव्या बाजूला ‘वामांगी रखुमाई’ नाही! ती का नाही? असा प्रश्न येथे विठ्ठलाला स्वतः रखुमाईच विचारीत आहे! फार छान कल्पना येथे कवीला स्फूरलेली असून रचना जमली आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी नसून ‘ती’ वेगळय़ा मंदिरात उभी आहे! ‘‘असे का झाले?’’ या संदर्भात आजवर अनेकांनी, संतांनी, कवींनी आपापल्या कल्पना, काव्यातून, गीतांमधून मांडल्या आहेत. कोणी म्हणाले, रखुमाई रूसून-फुगून वेगळी झाली! तर कोणी म्हणाले, ‘पुंडलिकाच्या भेटीसाठी अधीर झालेला विठ्ठल त्या रखुमाईला आवडला नाही म्हणून ती रागावली व रागाने फणफणतच तरातरा दूर निघून गेली! कोणी म्हणाले, ‘‘भक्ताच्या ‘गळाभेटीत’ पत्नीचा अडसर कशाला? म्हणून विठ्ठलानेच तिला ‘दूर’ ठेवले!’’
परंतु ‘सांग विठ्ठला’ या रचनेमध्ये स्वतः रखुमाईच विठ्ठलाला प्रश्न विचारते, ‘‘कधी रे पाहसी वळूनी?’’, ‘‘काय वाद तुमचा झाला?’’ स्वतः विठ्ठलानेच तोंड उघडून या व अशा प्रश्नांचे उत्तर दिल्याशिवाय भक्तांचे प्रश्न व त्यांची जिज्ञासा शांत होणार नाही म्हणून आता स्वतः रखुमाई-रुक्मिणीनेच भक्तांचे प्रतिनिधित्व पत्करून विठ्ठलाला, पर्यायाने आपल्या पतीला ‘बोलते’ करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे!
रखुमाईच्या प्रश्नाचे व भक्तांच्या मूळ जिज्ञासेचे कवी कोकीळांचे विठ्ठलमुखी उत्तर असे की, ‘पुंडलिकाच्या भेटीसाठी अधीरतेने, उत्सुकतेने, धावत-पळत, पंढरपुरी, पुंडलिकाच्या झोपडीच्या दारात प्रथम ‘पांडुरंग-विठ्ठल’ एकटेच पोचले होते! आणि त्यांच्यासाठी पुंडलिकाने फक्त एकच ‘वीट’ दारात फेकली होती! त्या एकाच विटेवर हे ‘विठ्ठल’ युगे अठ्ठावीस’ सतत उभेच आहेत! रुक्मिणी-रखुमाई नंतर मागाहून आली, तिच्यासाठी पुंडलिकाने वीट ठेवलीच नसल्याने पंढरपुरात रुक्मिणीचे स्थान विठ्ठलाशेजारी नसून ते वेगळे आहे!
ते काहीही असो, ‘सांग विठ्ठला’ ही रचना रखुमाईच्या प्रश्नामुळेच भावस्पर्शी झाली आहे, हे मात्र लक्षात येते. ‘विसावा’ या रचनेमध्येही कवीने कौरवसाम्राज्याच्या महामंत्री विदुराला पुन्हा एकदा ‘भिकारी’ ठरवून कृष्णाला त्याच्या झोपडीतल्या ‘कण्या’ खायला लावल्या आहेत!
आजवरच्या संतकवींनी व नंतरच्या आधुनिक कवींनीही या महामंत्री विदुराला दरिद्री सुदामाच्या पंगतीत आणून बसवले आहे! शतकानुशतके आणि पिढय़ान् पिढय़ा चालत आलेल्या रूढी आणि ‘रूढीग्रस्त घटना’ यांचा जनमानसावर कसा व किती अमीट पगडा असतो त्याचे हे एक आणखी उदाहरण आहे. थोर थोर कृष्णभक्तांची सूची तशी खूप मोठी असताना त्या सूचीत ‘कृष्ण प्रिय विदुराला मुद्दाम कण्या वेचून दुपारची वेळ भागवणारा’ असा दरिद्री दाखवण्याची तशी गरज नाही!
कविवर्य कोकीळ यांनी ‘विदुराची रूढी’ पत्करून त्याच्या कण्या पुन्हा एकदा कवितेत शब्दरूप केल्यामुळे हे लिहावे लागले! वास्तविक तो ‘महामंत्री’ असूनही त्याच्यावर हा असा ‘अन्याय’ पुनः पुन्हा होऊ नये म्हणून हा चिकित्सेचा प्रपंच! असो! मला स्वतःला संजीव कोकीळ यांच्या या सीडीतील सहाही रचना मनापासून आवडल्या म्हणून माझी प्रतिक्रिया येथे शब्दांकित केली आहे. कवीला अत्यावश्यक असणारे भावसमृद्ध मन कोकीळ यांच्याकडे आहे. त्यांच्या बुद्धीला समाजभान असून ते सत्याचे राखणदार व वाणीचे खबरदार आहेत! ते स्पष्टवक्ते व फटकळ असले तरी मृदुभाषी असून माजी पोलीस अधिकारी असूनही तुलनेने खूपच नम्र आहेत!
अशा गुणवंतांचे माझे हे निरीक्षण व परीक्षण समजावे! इत्यलम्!





























































