
पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागाातून दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत त्रिकुटाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 दुचाकी आणि एक रिक्षा असा 4 लाख 30 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. महेश लक्ष्मण धुमाळ (वय 23, रा. आंबेगाव, दौंड), प्रतीक संदीप काळे (वय 21, रा. केडगाव, दौंड) आणि महेश दिलीप जगताप (वय 23, रा. कडेठाण, दौंड ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हडपसर पोलिसांचे तपास पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी ससाणेनगर परिसरात क्रमांक नसलेल्या दुचाकीवर एकजण थांबल्याचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने व अविनाश गोसावी यांना दिसून आले. त्याच्याकडे विचारपूस केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेत चौकशी केली. त्यात त्याचे दोन साथीदार दुचाकी चोरण्यासाठी दुसरीकडे गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी 10 दुचाकी आणि एक रिक्षा चोरल्याची कबुली दिली.
आरोपींनी हडपसर, चिखली, हातवळण (दौंड), बोरीपार्धी चौफुला, भारती विद्यापीठ, लोणीकंद परिसरातून वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, तपास पथकाचे एपीआय हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, अकबर शेख, शाहिद शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांनी केली.
मौजमजा करण्यासाठी दुचाकींची चोरी
चोरलेल्या दुचाकींची कमी किंमतीत विक्री करून मिळालेल्या पैशांतून आरोपी मौजमजा करीत होते. त्यांनी जिल्ह्यासह शहरातून दुचाकींसह रिक्षा चोरून विक्री केली होती. मात्र, हडपसर पोलीसांच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने आणि अविनाश गोसावी यांच्या प्रसंगावधानाने आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.






























































