नगर जिल्हा रुग्णालयात पोलिसांची रुग्णवाहिका चालकाला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

तोफखाना पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी जिल्हा रुग्णालयात दबंगगिरी करत तेथील कर्मचार्‍याला मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्याने रुग्णवाहिका चालक सुनील गवळी यांना केलेल्या मारहाणीमुळे त्यांना कमी ऐकू येत आहे. या प्रकरणी गवळी यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली आहे. या घटनेविरोधात जिल्हा रुग्णालय कर्मचारी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गवळी यांना मारहाण करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे. तसेच सोमवारी कामबंद आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

रुग्णवाहिका चालक सुनील गवळी बुधवारी (ता. 20) रुग्णालयाच्या ओपीडीसमोर रुग्णवाहिका पार्क करत होते. त्यावेळी रुग्णवाहिका पार्किंगच्या ठिकाणी इतर दुचाकी असल्याने त्या दुचाकी बाजूला करत रुग्णवाहिका पार्क करत होते. बाजूला केलेल्या दुचाकींमध्ये एका पोलीस कर्मचार्‍याचीही दुचाकी होती. या दुचाकीशेजारीच गवळी यांनी रुग्णवाहिका पार्क केली. त्यामुळे पोलीस कर्मचारी तिथे आला आणि गवळी यांच्यावर आरडाओरडा करायला सुरुवात केली. पोलीस कर्मचार्‍याने रुग्णवाहिकेवर थापा मारत गवळी यांना शिवीगाळ केली. तुला पोलिसी हिसका दाखवितो, असे म्हणून गवळी यांना रुग्णवाहिकेच्या बाहेर ओढत मारहाण केली. ही घटना रुग्णालयाच्या ओपीडीसमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चित्रित झाली आहे. ते चित्रीकरण अधिकार्‍यांनी पाहिले. त्यात गवळी यांच्या तक्रारीत तथ्य आढळले. ते पाहून पोलिसांनी गवळी यांना तोफखाना पोलीस ठाण्यात नेले. तिथे काही कर्मचाऱ्यांनी गवळी यांना शिवीगाळ केली. दोन कर्मचार्‍यांनी गवळी यांना मारहाण करत त्यांच्या कानशिलात लगावली. जिल्हा रुग्णालयात ज्या पोलीस कर्मचार्‍याने मारहाण केली होती, त्याच्या पाया पडून माफी मागण्यास गवळी यांना भाग पाडले. तोफखाना पोलीस ठाण्यात गवळी यांना झालेल्या मारहाणीमुळे त्यांना ऐकायला कमी येत आहे. गवळी यांनी या सर्व प्रकाराची जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली आहे.

कर्मचारी संघटनेचा कामबंदचा इशारा

चालक सुनील गवळी यांना पोलीस कर्मचार्‍यांकडून झालेल्या मारहाणीचा कर्मचारी संघटनेने निषेध केला आहे. तोफखाना पोलिसांनी गवळी यांना दिलेली वागणूक मानव अधिकारांचे उल्लंघन करणारी असल्याचे जिल्हा रुग्णालयातंर्गत सर्व कर्मचारी संघटनेने म्हटले आहे. मारहाण करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी संघटनेने केली आहे. त्यासाठी संघटनेने सोमवारी (ता. 25) कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय धाडगे यांनी दिली आहे.