मुंबई पोलीस दलास गतवैभव मिळवून देणार; पोलीस आयुक्त  हेमंत नगराळे यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलीस दल सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. काही पोलिसांमुले दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. पण आता सर्व अधिकारी, कर्मचाऱयांच्या सोबतीने मलिन झालेली प्रतिमा सुधारून मुंबई पोलीस दलास पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन, अशी ग्वाही देत  अधिकारी व कर्मचाऱयांनी प्रामाणिक आणि सचोटीने काम करा. आपल्या पोलीस दलाचे नाव खराब होईल असे कोणतेही कृत्य करू नका, अशी सूचना नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केली.

मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. त्यावेळी बोलताना नगराळे म्हणाले की, मुंबई पोलीस दल हे सक्षम आणि कोणत्याही आव्हानाला सामोरे जाणारे पोलीस दल आहे. आतापर्यंत कोणतेही संकट असो मग तो दहशतवादी हल्ला, नैसर्गिक आपत्ती किंवा कोरोना महामारी असेल, जनतेच्या सुरक्षेसाठी याच पोलिसांनी आपल्या जिवाची बाजी लावली. पोलिसांकडून सर्वोत्तम कामे होत असताना काहींमुळे एक चुकीचे काम झाले; पण त्यामुळे संपूर्ण पोलीस दलाला खराब बोलणे योग्य नाही. अलीकडे जे काही घडले त्यात पोलिसांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. पण ही नाजूक परिस्थिती लवकरच बदलेल.आम्ही सर्व मिळून मुंबई पोलिसांचे वैभव पुन्हा मिळवू. जनमानसात आमची प्रतिमा नक्कीच पुन्हा उज्ज्वल करू, असा ठाम विश्वास हेमंत नगराळे यांनी व्यक्त केला.

सध्या जे काही घडतेय ते बरोबर नाही. एका चुकीच्या कामामुळे पूर्ण दलाची बदनामी होतेय. हे चित्र लवकरच बदललेले असेल. मुंबई पोलिसांचे नाव चांगले होईल. कोणतीही टीका होणार नाही यासाठी चांगले व सक्षमपणे काम करू. आता जे काही घडतेय तसे यापुढे घडू देणार नाही, अशी ग्वाही नगराळे यांनी यावेळी दिली.

सर्वांनी प्रामाणिक व सचोटीने काम करावे. जनमानसात आपली प्रतिमा चांगली कशी राहील हाच विचार करावा. असे कोणतेही काम करू नका, की ज्यामुळे स्वतःला, कुटुंबाला आणि पोलीस दलाला काळा डाग लागेल. कायद्याच्या चौकटीत राहून नागरिकांच्या हिताचे काम करावे. कोणीही चुकीचा मार्ग धरू नये आणि वरिष्ठांनी आपल्या हाताखाली काम करणाऱया अधिकारी, कर्मचाऱयांच्या कामाचे निरीक्षण करावे, अशा सूचना नगराळे यांनी केल्या.