
>> प्रभाकर पवार
पुजारी हा पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल शहरातील एका सलूनमध्ये दाढी करताना जानेवारीअखेरीस पकडला गेला असून लवकरच त्याला हिंदुस्थानच्या ताब्यात देण्यात येणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतील पोलिसांना वॉण्टेड असलेल्या या चिंधी फोनभाईवर खंडणीच्या असंख्य केसेस आहेत. मूळचा मँगलोरचा असला तरी मुंबईत चहाच्या टपरीवर काम करणारा रवी पुजारी अंधेरी (पूर्व) चकाला येथे आपली पत्नी पद्मा, दोन मुली व एका मुलासह राहात होता. आता त्याची पत्नी व मुलं लंडनला राहतात. छोटा राजन टोळीत सक्रिय झाल्यानंतर मात्र त्याचे घरी जाणे-येणे कमी झाले. तो छोटा राजनचा हरकाम्या झाला. छोटी मोठी कामे करू लागला. जेव्हा छोटा राजनवर 2000 साली बँकॉक येथे छोटा शकील टोळीतील मुन्ना झिंगाडाकडून हल्ला झाला तेव्हा छोटा राजन टोळीतून बरेच गुंड फुटले. त्यात रवी पुजारी हाही होता. छोटा राजन टोळीतून फुटल्यानंतर रवी पुजारीने आपले स्वतंत्र खंडणीवसुलीचे दुकान आशियात थाटले. बँकॉक, सिंगापूर, मलेशिया देशातून तो मुंबईसह देशभरातील व्यापाऱयांना फोन करून खंडणीसाठी धमक्या देऊ लागला. त्यातून बरेच मोठे मासे त्याच्या गळाले लागले. धमकीला घाबरून काही व्यापाऱयांनी पोलिसांना न कळवता हवालामार्फत परदेशात खंडणी पाठवून दिली. त्या पैशातून रवी पुजारीने आशियातील काही देशांमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू केला. खोटय़ा नावाने खोटय़ा पासपोर्टवर वावरणारा रवी पुजारी हा परदेशात एक व्यावसायिक म्हणून वावरत होता. परंतु कर्नाटक पोलिसांनी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आदी 60च्या वर केसेसमध्ये वॉण्टेड असलेल्या या गुंडांचा माग काढल्यामुळे व केंद्र सरकारने रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यामुळे पन्नाशी ओलांडलेल्या रवी पुजारीला आफ्रिकेतील सेनेगल पोलिसांनी पंधरा दिवसांपूर्वी बनावट पासपोर्टप्रकरणी अटक केली.
गेल्या दोन दशकांहूनही अधिक काळ पुजारी हिंदुस्थानी पोलिसांना गुंगारा देत होता. तो सापडल्याने महाराष्ट्रातील ठाणे व मुंबई पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आता देशभरातील व्यापाऱयांना खंडणीसाठी जाणारे फोन बंद होतील अशी अपेक्षा करण्यात येत आहे. छोटा राजनबरोबर रवी पुजारीचे बिनसल्यानंतर रवी पुजारीने आपली स्वतंत्र पुजारी टोळी स्थापन करून खंडणीसत्र सुरू केले. त्यात त्याला यश आले. खंडणी देण्यास नकार देणाऱया व्यापाऱयांच्या, बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालय व घराबाहेर आपल्या शूटरना पाठवून पुजारी हवेत गोळीबार करावयास सांगायचा. त्यानंतर फोन करून तो त्यांना धमकावयाचा. ‘आज सिर्फ आवाज निकाला है इसके बाद हवा में नही, अब गोली सिर्फ सीने में जायेगी, ये याद रखना!’ रवी पुजारीच्या अशा धमक्यांमुळे घाबरून व्यापारी, बिल्डर खंडणी द्यायचे. मुंबईतील रवी पंजाबी नावाचा एक बिल्डर तर रवी पुजारीचा खबरीच झाला होता. तोच बांधकाम व्यावसायातील आपल्या व्यावसायिकांची रवी पुजारीला टीप देऊन त्याच्याकडून खंडणी उकळायला लावायचा, अशी माहिती मिळाल्यानंतर मुंबई क्राईम बँचच्या अधिकाऱयांनी रवी पुजारीचा बिल्डर साथीदार रवी पंजाबीला मोक्कान्वये अटक केली. तरीही रवी पुजारीचे खंडणीसत्र थांबले नाही. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदि शहरांत रवी पुजारी टोळीने खंडणीसाठी हैदोस घातला. तेव्हा मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱयांनी राजेंद्र चौधरी ऊर्फ नेपाळी या पुजारी टोळीतील गुंडाचा चकमकीत खात्मा केला. जवळजवळ दोन डझन पुजारी टोळीतील गुंडांना अटक केली. तेव्हा रवी पुजारीने मुंबईतून पळ काढून ठाणे शहरात ठाण मांडले. तेथेही तो कमालीचा सक्रिय झाला. तेथेही त्याला कोटय़वधींची खंडणी मिळाली. जेलमधून सुटलेल्या पोरांच्या हातावर पाच-दहा हजार टेकवायचे व टार्गेट केलेल्या व्हीआयपीच्या कार्यालयाबाहेर गोळीबार करावयास सांगायचा. त्यानंतर खंडणीसाठी धमकी द्यायचे अशी रवी पुजारीची कार्यपद्धती असून कमीत कमी रक्तपात करून रवी पुजारी आज करोडपती झाला आहे. परदेशात त्याची एक हॉटेल व बांधकाम व्यावसायिक अशीच ओळख आहे.
हॉटेल व बांधकाम व्यावासायिकांना धमकावून कोटय़वधी रुपये कमविणाऱया रवी पुजारीने सिनेनिर्मात्यांनाही धमकावले होते. महेश भट, करीम मोरानी, सिने अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन, शाहरूख खान आदींना धमकावणाऱया रवी पुजारीच्या शूटरनी हवेत गोळीबार करून कोटय़वधींची खंडणी वसूल केली. परंतु अंधेरी (पश्चिम) येथे रवी पुजारीच्या भाडय़ाच्या शूटरनी एका बांधकाम व्यावसायिकाऐवजी साईटवर असलेल्या एका इंजिनीअर व सुपरवायझरवरच गोळीबार करून त्यांचा नाहक बळी घेतला. त्यामुळे रवी पुजारीसारख्या खंडणीखोरांना गुंड म्हणावे की षंढ, असा प्रश्न पडतो. या षंढाने कर्नाटकातील आपल्याच गावच्या शाळा, कॉलेजातील तरुणांना फसविले आहे. ‘तू मुंबईला जात आहेस ना… मग मी सांगतो त्या ठिकाणी जा. मला एका व्यक्तीकडून पैसे येणे बाकी आहेत ते घेऊन ये. बिचारा निरपराध तरुण रवी अण्णाने सांगितल्यावर दिलेल्या ठिकाणी जायचा आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकायचा. म्हणजे खंडणी गोळा करण्यासाठी रवी पुजारीने अनेकदा आपल्याच गावच्या तरुण पोरांनाही अडकविले आहे. सहसा कोणताही बडा गँगस्टार निरपराध शाळा-कॉलेजातील पोरांचा गैरवापर करून घेत नाही. परंतु रवी पुजारी या घातकी गुंडाने अनेक तरुणांना पाच-दहा हजारांचे आमिष दाखवून जेलमध्ये पाठविले आहे. रोज एक खंबा घेऊन बसणाऱया व दारूच्या नशेत मुंबईसह देशभरातील व्यापाऱयांना खंडणीसाठी धमकावणाऱया रवी पुजारीविरुद्ध देशभरात 150 च्या वर गुह्यांची नोंद आहे त्यापैकी 50 च्या वर खंडणी व खुनाचा प्रयत्न अशा गुह्यांची मुंबई पोलिसांत नोंद आहे. खंडणीच्या पैशातून रवी पुजारीने ‘नमस्ते इंडिया’ या हॉटेलची चेन आफ्रिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया तसेच आशियातील काही देशात उभी केली असून त्याच्या अटकेमुळे त्याच्या हॉटेल साम्राज्याला तडा गेला आहे. त्याच्या पापाचे घडे भरल्याने तो जेलमधून लवकर सुटेल असे वाटत नाही. अखेर अति तेथे माती. खंडणीचा मोह त्याच्या मुळावर आला आणि त्याला बेडय़ा पडल्या. गुंडांची कटकारस्थानं फार काळ टिकत नाहीत. कधी तरी त्याचा पर्दाफाश हा होतोच.



























































