
थकीत मानधनासाठी उपोषण करणाऱया बचत गटाच्या महिला सदस्यांनी आज नागपुरातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर धडक देऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केला. या महिलांना पोलिसांनी संविधान चौकातच रोखल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. हनुमान चालिसा पठणापासून रोखल्याने या महिलांनी संताप व्यक्त केला.
पाकिस्तानात जाऊन हनुमान चालीसा म्हणायची का?
आम्ही शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन करीत असताना पोलिसांनी आम्हाला रोखले, ही दडपशाही नाही तर काय?, असा सवाल आंदोलक महिलांनी केला. हनुमान चालिसा पठण करण्यास विरोध का? आम्ही पाकिस्तानात जाऊन हनुमान चालीसा पठण करायची का? असा सवालही कार्यकर्त्यांनी केला. खासदार नवनीत राणा यांनी मुंबईत केलेल्या ड्रामेबाजीवेळी फडणवीस यांनी त्यांची बाजू घेतली होती. त्यांनी पाकिस्तानात जाऊन हनुमान चालिसा म्हणायची का?, असे विचारले होते. तोच सवाल आज आंदोलकांनी केला.

























































