हिंगोलीत किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत आणि उत्साहात मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

शहरासह जिल्हाभरातहिंगोली लोकसभा क्षेत्राच्या निवडणुक मतदानासाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत १७ लाख ३२ हजार ५४० मतदारांपैकी ७ लाख ९६ हजार ३९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वृध्द व दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी वाहन व व्हिलचेअरची सुविधा चांगलीच कामी आली. काही ठिकाणी ईव्हीएम व यंत्रात बिघाड झाल्याने तर सेनगाव तालुक्यात साबलखेडा येथे पोलीस कर्मचाऱ्याने घातलेल्या गोंधळामुळे काही काळ मतदान बंद पडले होते. किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत आणि उत्साहात मतदान पार पडले. तर जवळाबाजार येथे पुर्वसूचना न देता एक मतदान केंद्र स्थलांतरीत केल्याने मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला.

हिंगोली लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी आज १८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७ ते ९ या वेळेत लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाची टक्केवारी ७.६८ टक्के ईतकी होती. ९ पर्यंत ८५ हजार ३३८ पुरुष तर ४७ हजार ७५७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. तर सकाळी ११ वाजेपर्यंत २ लाख १९ हजार ८९१ पुरुष व १ लाख ३६ हजार २६२ अशा एकूण ३ लाख ५६ हजार १५३ मतदारांनी मतदानाचा हक्क पार पाडला. सकाळी ११ ते दुपारी १ या दरम्यान मतदानाची टक्केवारी चांगलीच वाढली. १ वाजेपर्यंत ३ लाख ६४ हजार ७७० पुरुष तर २ लाख २४ हजार ५५१ अशा एकूण ५ लाख ८९ हजार ३२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ही टक्केवारी ३४.०१ इतकी आहे. ६ विधानसभा क्षेत्राची दुपारी ३ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ४५.९७ इतकी सरासरी आहे. यामध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघात ७० हजार ४५२ पुरुष तर ५४ हजार ६२५ महिला असे एकूण १ लाख २५ हजार ६७७ इतके मतदान झाले असून उमरखेडची टक्केवारी ४३.१३ आहे. किनवट विधानसभा मतदारसंघात ६७ हजार ५८९ पुरुष तर ५२ हजार २३४ महिला असे एकूण १ लाख १९ हजार ८२३ इतके मतदान झाले असून किनवटची टक्केवारी ४६.३२ आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघात ६४ हजार १८७ पुरुष तर ५८ हजार ३६६ महिला असे एकूण १ लाख २२ हजार ५५३ इतके मतदान झाले असून हदगावची टक्केवारी ४४.१० आहे. वसमत विधानसभा मतदारसंघात ७४ हजार २३९ पुरुष तर ६२ हजार ९ महिला असे एकूण १ लाख ३६ हजार २५० इतके मतदान झाले असून वसमतची टक्केवारी ४६.८९ आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात ९३ हजार ८१३ पुरुष तर ५७ हजार २ महिला असे एकूण १ लाख ५० हजार ८१५ इतके मतदान झाले असून कळमनुरीची टक्केवारी ४९.४४ आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघात ८५ हजार ८९९ पुरुष तर ५५ हजार ९७५ महिला असे एकूण १ लाख ४१ हजार ८७४ इतके मतदान झाले असून हिंगोलीची टक्केवारी ४५.७१ आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजेपर्यंत ४ लाख ५६ हजार १८१ पुरुष तर ३ लाख ४० हजार २११ अशा एकूण ७ लाख ९६ हजार ३९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

महिलांचे औक्षण करुन स्वागत
हिंगोली शहरातील सीटी क्लब हे मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणुन कार्यरत करण्यात आले होते. या केंद्रावर सर्व कामकाज महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळले. मतदानासाठी येणाऱ्या महिला मतदारांचे औक्षण व पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मिनीयार या दोघांनी सपत्नीक मतदानाचा अधिकार सीटी क्लब येथे बजावला.

मतदान केंद्राच्या स्थलांतरामुळे नागरिकांची गैरसोय
औंढा नागनाथ तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत असलेले मतदान केंद्र क्रमांक ३८/६/७ हे केंद्र अचानक पुरजळ रस्त्यावरील इंदिरा गांधी कन्या विद्यालय येथे स्थलांतरीत करण्यात आले. प्रशासनाच्या या गलथान कारभाराचा फटका मतदारांना बसला. प्रशासनाकडुन देण्यात आलेल्या मतदार चिठ्ठीवर कृऊबाच्या केंद्राचा उल्लेख असल्याने सकाळी ७ वाजताच मतदार केंद्रावर पोहचले. मात्र, त्या ठिकाणी गेल्यावर मतदान केंद्र स्थलांतरीत केल्याच्याी माहिती देण्यात आली. नव्याने स्थलांतरीत केलेले मतदान केंद्र १ कि.मी. अंतरावर असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

यंत्रात बिघाड, मतदान ठप्प
हिंगोली शहरातील रिसालाबाजार व आदर्श कॉलेजमधील प्रत्येकी एका मतदान केंद्रावर तसेच वसमत शहरातील आंबेडकरनगर भागातील बुथ क्र. २२७, कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, वसफळ, सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रीक बिघाड झाल्यामुळे १० मिनीट ते अर्ध्या तासापर्यंत मतदान प्रक्रिया ठप्प होती. सिंदगी येथे मतदान यंत्र बदलून देण्यात आले. तर हिंगोलीतील रिसालाबाजार व आदर्श महाविद्यालयाच्या केंद्रावर यंत्राचे सीआरसी बटण दाबल्यावर ही प्रक्रिया सुरुवात करण्यात आली.

साबलखेडा येथे गोंधळ
सेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथे मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मद्य प्राशन करुन अरेरावी केल्याचा आरोप नागरिकांनी केला. तसेच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी साबलखेडा येथे जाऊन नागरिकांची समजूत काढत बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी तात्काळ बदलून दिल्यावर या ठिकाणचे मतदान सुरु झाले. मुंबई लोहमार्ग पोलीस विभागातील सुरेश पवार असे गोंधळाला कारणीभूत ठरलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, वाहन
हिंगोली शहरासह जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी प्रशासनाने वाहनाची व्यवस्था केली. तसेच मतदान केंद्रावर व्हीलचेअरव्दारे दिव्यांगाचे मतदान करुन घेण्यात आले. हिंगोली शहरात मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिका कर्मचाऱ्याने दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी प्रयत्न केले.

एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे योगदान
राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीचे विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या मतदान केंद्रावर दिव्यांग व वृध्द मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करत होते. वाहनातून उतरविल्यावर व्हीलचेअरवर बसवून मतदान पूर्ण झाल्यावर परत वाहनात बसविण्यासाठी या विद्यार्थ्यांची चांगलीच मदत झाली.

मतदारांच्या रांगा, महिलांचा टक्का कमी
सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान जिल्हाभरात वेगवेगळ्या मतदान केंद्रावर तुरळक गर्दी झाली होती. मात्र, ९ नंतर मतदानाचा वेग वाढला. विविध ठिकाणी नागरिकांची उन्हापासून सुरक्षा व्हावी, यासाठी मंडप देखील टाकण्यात आले होते. नागरिकांनी रांगेत उभे राहून मतदान केले. सहाही विधानसभा क्षेत्रात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांच्या मतदानाचा टक्का कमी असल्याचे दुपारी ३ वाजेपर्यंत दिसून आले. दुपारी ३ पर्यंत महिलांपेक्षा तब्बल १ लाख १६ हजार पुरुष मतदान जास्त झाले होते.

अधिकाऱ्यांच्या भेटी
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मिनीयार, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, उपजिल्हाधिकारी प्रवीण पुâलारी, प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे, डीवायएसपी सुधाकर रेड्डी यांच्यासह निवडणुक निरीक्षकांनी विविध मतदान केंद्रावर भेटी देऊन मतदान प्रक्रिया व बंदोबस्ताची पाहणी केली.

कार्यकर्त्यांचा उत्साह
दरम्यान, शिवसेनेसह काँग्रेस, वंचित आघाडी व अन्य काही उमेदवारांचे कार्यकर्ते सकाळपासूनच मतदान प्रक्रियेच्या लगबगीत होते. शहरासह जिल्हाभरात शिवसैनिकांनी मतदारांना मतदान करण्याची विनंती करत मतदान केंद्रापर्यंत पोहचविले. कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह या निवडणुकीमध्ये दिसून आला.