आम्ही लग्नाळू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

>> निलय रमाकांत वैद्य

कोरोनाच्या काळात सगळी व्यवस्था कोलमडली. नोकरी, धंदा, व्यवसाय यांचे नुकसान झालेच परंतु आपण मानसिकरित्याही खचलो. कोविड काळात समाजातील प्रमुख अशा विवाहसंस्थेवरही याचा परिणाम झाला. कोलमडलेली विवाह व्यवस्था आणि त्यातून मुले-मुली, त्यांचे पालक यांना या नैराश्यातून बाहेर आणणं गरजेचं आहे. कोविडनंतरचा आताचा हा काळ मनाला उभारी देणारा आहेच परंतु या काळात गतवर्षी कोलमडलेल्या व्यवस्थांना पुन्हा उभारी देणंही तितपंच गरजेचं आहे.

दिवाळी सरली. पाहता पाहता आठवडा झाला. उद्या सोमवारपासून तुलसी विवाहारंभ. हा सोहळा पुढचे पाच दिवस चालणार. येत्या शुक्रवारी तुलसी विवाहाचा अंतिम दिवस. हा दिवस म्हणजे तुलसी विवाह समाप्ती. एक महत्त्वपूर्ण दिवस. या तुलसी विवाहाच्या निमित्ताने ‘पवित्र विवाह डॉट कॉम’ आणि ‘माय मातृभूमी फाऊंडेशन’ या संस्थांनी मिळून एका आगळय़ावेगळय़ा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे नाव मोठे मजेशीर आहे – ‘आम्ही लग्नाळू’! दिनांक 19 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता दादरच्या सार्वजनिक वाचनालय, धुरू हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यात प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, कायदेतज्ञ शर्मिली पुरव, विवाह डॉट कॉमचे सर्वेसर्वा ऋषिकेश कदम, जीवनशैली तज्ञ डॉ. नेहा वैद्य हे मान्यवर सहभागी होणार आहेत. कोविड काळात कोलमडलेली विवाह व्यवस्था आणि त्यातून मुले-मुली, त्यांचे पालक यांना बाहेर पडण्यासाठी समुपदेशन हा विधायक हेतू या कार्यक्रमाच्या आयोजनामागे आहे.

‘आम्ही लग्नाळू’ या एक अभिनव उपक्रम आहे. ‘पवित्र विवाह डॉट कॉम’चे सर्वेसर्वा ऋषिकेश कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाबाबत ते सांगतात, ‘‘मराठी समाजातील विवाह व्यवस्था हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. गेले सुमारे दीड वर्ष कोविड काळात गेले. संपूर्ण जगाला उद्ध्वस्त केले. घरेच्या घरे कोलमडून गेली. उद्योगधंद्यांची वाताहत झाली. आपल्या देशातील, विशेषतः महाराष्ट्रातील विवाह व्यवस्था अस्ताव्यस्त झाली. अशा परिस्थितीत लग्नं कशी होणार? लग्नाचे हॉल बंद, भेटीगाठी बंद. खिशात पैसा नाही. हॉस्पिटलवर वारेमाप खर्च झाला. कोणाचे आई-वडील, कोणाचे भाऊ-बहीण, कोणाचे जिवलग मित्र-मैत्रिणी गेले. लग्न सोहळय़ासाठी जी ऊर्जा लागते ती अशा परिस्थितीत येणार कुठून? त्यामुळे विवाहोत्सुक मुले-मुली, त्यांचे पालक खचून गेले. सामाजिक समतोल ढासळला. तो पूर्ववत करण्याच्या उद्देश या समुपदेशनपर कार्यक्रमातून साध्य होईल असे नक्कीच वाटते.’’
विवाहोत्सुकांना सध्या मुख्य गरज आहे ती मार्गदर्शनाची आणि समुपदेशनाची. यासाठी विख्यात मनोविकार तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांचा यातला सहभाग महत्त्वाचा आहे. त्यांनी याबाबत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. ‘‘आपल्या समाजाची एक अत्यंत चुकीची मानसिकता आहे. आपण लग्न म्हणजे एक दिवसाचा सोहळा मानतो. खरे तर लग्न म्हणजे आयुष्यभराचा प्रवास असतो. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर नवरा-बायकोमध्ये संवाद व्हायला पाहिजे. हळूहळू संवादाचे रूपांतर सुसंवादात व्हायला पाहिजे. लग्न यशस्वी होण्याची ही सगळय़ात पहिली पायरी आहे, पण आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आपले प्राधान्य असते, कोणता हॉल घ्यायचा, जेवणाचा मेनू काय ठेवायचा, नातलगांचे मानपान कसे सांभाळायचे, शॉपिंग कुठून करायचे… वगैरे वगैरे. हे सगळे मुद्दे पुढे येतात आणि महत्त्वाचा मुद्दा राहतो बाजूला!’’

‘‘एखादी समस्या, प्र्रश्न, संकट उभे राहिले किंवा कुठे अपयश आले की, त्याची जबाबदारी दुसऱयावर टाकण्याची मनुष्यप्राण्याची मानसिकता असते, पण कोविड काळासाठी कोणाला दोष देणार? त्यामुळे विचित्र अशी कुचंबणा झाली, वैफल्य वाढले. खरे तर सगळी माणसे चोवीस तास घरात असल्यामुळे सुसंवाद वाढवण्याची आयती संधी चालून आली होती. या संधीचे सोने केलेय असे मात्र दुर्दैवाने कुठे दिसले नाही. मुले आणि पालक यांच्यातली दरी वाढली. अर्थार्जनाचे मार्ग बंद झाले. लग्नं रखडली. त्यामुळे व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक वैफल्य वाढताना दिसले. या समस्येवर एकच उपाय. सुसंवाद, पण त्यासाठी आधी संवाद तर घडायला हवा.’’

गेला दीड वर्षाचा कालावधी हा विदारक होता. या कोविड काळात कोणाची लग्नं झाली नाहीत. त्यामुळे तरुण मुले-मुली, त्यांचे आई-वडील यांच्या मनातले वैफल्य वाढत गेले. ही झाली अविवाहित तरुणांची कथा. विवाहित जोडप्यांची व्यथा तर पराकोटीची वाढली. कोविडपूर्वी नवरा बायकोत असलेली थोडी कुरबूर शिगेला पोहोचली. नोकरी-धंदा बुडाला. खिशात पैसा नाही हे त्यामागचे प्रमुख कारण.

विवाह समुपदेशानाच्या कुटुंब न्यायालयात कार्यरत असलेल्या कायदेतज्ञ वकील शर्मिली पुरव यासुद्धा सहभागी होणार आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांत फॅमिली कोर्टात अनेक केसेस हाताळल्या आहेत. गेल्या दीड वर्षात त्यांनी अनेक कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे पाहिली. यानिमित्ताने विवाहित, अविवाहित तरुणांना त्या या माध्यमातून सल्ला देऊ इच्छितात की, स्वतःचे आत्मपरीक्षण करा. स्वतःसाठी, आपल्या जोडीदारासाठी थोडा वेळ राखून ठेवा. समस्या तर सर्वांकडे असतात, पण त्यावर उपायही असतो ही वास्तविकता कधी विसरू नका. एकमेकांच्या मतांचा, विचारांचा आदर करा.’ कोविडपश्चात काळात अशा समुपदेशनपर कार्यक्रमाची नितांत गरज आहे हे सध्याच्या स्थितीवरून कळते.

[email protected]