
कोरोनामुळे पाच वर्षं रखडलेले क्रीडा पुरस्कार अखेर मुंबई मराठी पत्रकार संघाने जाहीर केले आहेत. येत्या 19 मे रोजी क्रीडा पत्रकारितेत अतुलनीय योगदान देणाऱया क्रीडा पत्रकारांना ‘महेश बोभाटे स्मृती क्रीडा पुरस्कार’ आणि ‘आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कार’ यांनी गौरविले जाणार आहे. आपल्या अद्भुत लेखणीने वाचकांवर मोहिनी घालणारे ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना मरणोत्तर क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून शरद कद्रेकर, संजय परब, विजय साळवी आणि सुभाष हरचेकर या ज्येष्ठ क्रीडा पत्रकारांचाही सन्मान केला जाणार आहे.
आठ वर्षांपूर्वी क्रीडा पत्रकारितेत योगदानासाठी पत्रकार संघाने ज्येष्ठ आणि दिग्गज क्रीडा पत्रकारांसाठी महेश बोभाटे क्रीडा पुरस्कार तर युवा क्रीडा पत्रकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आत्माराम मोरे क्रीडा पुरस्कार सुरू केला होता. पहिले दोन वर्षे हे पुरस्कार सुरळीतपणे पार पडले, मात्र कोरोनानंतर या पुरस्कारांमध्ये खंड पडला आणि हे पुरस्कार गेली सहा वर्षे रखडले. काही पत्रकारांच्या पाठपुराव्यानंतर सहा वर्षांनी हा पुरस्कार सोहळा पुन्हा आयोजित केला जाणार आहे. पहिल्या दोन पुरस्कार सोहळय़ांप्रमाणे यंदाही हा पुरस्कार सोहळा दणक्यात आयोजित केला जाणार आहे.
ज्येष्ठ पत्रकारांसाठी दिल्या जाणाऱया महेश बोभाटे स्मृती पुरस्कारासह पुरस्कार्थींना रोख दहा हजार रुपये दिले जातील. तसेच युवा क्रीडा पत्रकारांना आत्माराम मोरे स्मृती पुरस्कारासह सात हजारांची रक्कमही दिली जाणार आहे. युवा पत्रकारांमध्ये तुषार वैती, प्रसाद लाड, जयेंद्र लोंढे आणि रोहित नाईक यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांचा वितरण सोहळा 19 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडणार असून हिंदुस्थानचे माजी हॉकी कर्णधार धनराज पिल्ले, ग्रॅण्डमास्टर प्रवीण ठिपसे आणि माजी शरीरसौष्ठवपटू विजू पेणकर यांच्या हस्ते त्यांचे वितरण केले जाईल, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.