खड्ड्यांबाबत कुडाळ बचाव समितीने सा. बां. विभागाला विचारला जाब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

कुडाळ शहरातील उद्यमनगर ते पोलिस स्थानक रस्त्याच्या दुरवस्थेबाबत मंगळवारी कुडाळ बचाव समितीने येथील सा. बां. उपविभाग कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. उपअभियंता सौ.अनामिका जाधव यांनी तातडीने खड्डे बुजविण्याचे आश्वासन देत खड्डे बुडवण्याचे काम तात्काळ हाती घेण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अॅड. राजीव बिले यांनी दिली.

कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यासह अन्य विविध खड्डेमय रस्त्यांच्या दुर्दशेबाबत कुडाळ बचाव समितीच्या बैठकीत संबंधित प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्य रस्त्यावरील खड्डे बुडवण्याची मोहीम नगरपंचायतीने सोमवार पासून हाती घेतली. मात्र उद्यमनगर ते पोलीस स्थानक पर्यंतच्या रस्त्याबाबत समितीने मंगळवारी सा. बां.उपविभाग कार्यालयावर धडक देत तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी केली. समितीचे अध्यक्ष अॅड. राजीव बिले, काका कुडाळकर, धीरज परब, आनंद गवंडे, प्रसाद गावडे, दिपक गावडे, आदींसह नागरीक उपस्थित होते.