
डीआरडीओे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हा पाकिस्तानी हेर महिलेवर इतका लट्टू झाला होता की त्याने अनेक गुप्त माहिती तिला दिली. त्यात गुप्त संरक्षण योजनांखेरीज हिंदुस्थानी क्षेपणास्त्र यंत्रणेचाही समावेश असल्याचा खुलासा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आपल्या आरोपपत्रात केला आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली होती. शासकीय गोपनीयता अधिनियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावर असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपपत्रानुसार, कुरुलकर आणि जारा दासगुप्ता नावाची महिला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्कात होते. तसंच, व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगद्वारेही ते एकमेकांशी संपर्क साधत होते. या पाकिस्तानी हेर महिलेने दावा केला होता की ती ब्रिटनमध्ये राहते आणि व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तिने कुरुलकर याला अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवून त्याच्याशी मैत्री केली होती. तपासणी दरम्यान तिचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानमधला असल्याचं आढळलं होतं.
या महिलेने ब्रह्मोस लाँचर, ड्रोन, यूसीव्ही, अग्नि क्षेपणास्त्र आणि मिलिटरी ब्रिझिंग सिस्टिमसह अन्य काही गुप्त आणि संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. कुरुलकर हा महिलेकडे आकृष्ट झाल्याने त्याने आपल्या वैयक्तिक वापरातील फोनमध्ये ही सर्व गुप्त माहिती घेतली होती आणि ती त्या महिलेला दिली होती. हे दोघंही जून 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत एकमेकांच्या संपर्कात होते, असा खुलासाही आरोपपत्रात करण्यात आला आहे.
कुरुलकर याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने डीआरडीओने अंतर्गत चौकशी सुरू केली. त्यापूर्वी फेब्रुवारी 2023मध्ये त्याने जाराचा फोन नंबर ब्लॉक केला होता. त्यानंतर कुरुलकर याला एका अज्ञात क्रमांकावरून ब्लॉकविषयी विचारणा करण्यात आली होती. कुरुलकर याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील आणि व्यावसायिक गोष्टी तिला सक्त मनाई असूनही सांगितल्याचंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.



























































