शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, साखर टाकून कॉफी गोड केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार या दोन बडय़ा नेत्यांची शनिवारी मुंबईत भेट झाली. पवारांच्या भेटीनंतर आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी साखर टाकून फक्त कॉफी गोड केली, अशा शब्दांत त्यांनी या भेटीबद्दल सूचक विधान केले. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या प्रबंधाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अनेक मान्यवरांना बोलावण्यात आले होते. यात शरद पवार आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांचाही समावेश होता. या कार्यक्रमानंतर या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मी या कार्यक्रमात वक्ता म्हणून आलो होतो. या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी कॉफी प्यायला बोलावले. शरद पवारही तेथे होते. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आज वेगवेगळय़ा मुद्दय़ांवर चर्चा झाली. त्यांच्यासोबतच अन्य 12 जणही उपस्थित होते. कॉफी घेण्याशिवाय तेथे काहीच झाले नाही, असे सांगत मी साखर टाकून कॉफी गोड केली आहे, असे सूचक विधान आंबेडकर यांनी यावेळी केले. आंबेडकरांनी यावेळी राज्य आणि पेंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. पंत्राटी भरतीसंदर्भातील निर्णय धूळफेक करणारा असून यासंदर्भात मोर्चे निघत आहेत, आंदोलने सुरू आहेत, उपमुख्यमंत्रीपदही पंत्राटी पद्धतीने भरा. सरकारने फसवाफसवीचे राजकारण थांबवावे, नाहीतर ते त्यांच्यावर उलटेल, असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिला.

भाजपसोबत कधीच जाणार नाही

काँग्रेस आंबेडकरांवर अन्याय करतेय, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. याचाही आंबेडकरांनी समाचार घेतला. भाजपने माझी चिंता करू नये, माझा भाजपला कायमचा विरोध आहे. काँग्रेस मला सोबत घेत नाही म्हणून मी भाजपकडे जाईन असे भाजप नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी फक्त वाट बघत राहावी, असा टोला आंबेडकरांनी भाजप नेत्यांना लगावला.

शुभसंकेत! काँग्रेसची प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकर व शरद पवारांची भेट ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. महाविकास आघाडीची पुढची सकारात्मक पावले पडण्याच्या दृष्टीने हा एक शुभसंकेत आहे. वंचित आघाडी आणि महाविकास आघाडीने आगामी निवडणुकीमध्ये एकत्र आले पाहिजे. आज भलेही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा आंबेडकरांच्या भाषेमध्ये कॉफी पिण्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचे संकेत त्यांनी दिले; जे काही असेल ते सकारात्मक आहे आणि आगामी काळामध्ये यातून एक संवाद सुरू होईल, असे कॉँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले.