मोदी बाबा दुसऱ्यांना खिलवतो आणि म्हणतो, अर्धं मला द्या! प्रकाश आंबेडकर यांचा जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ना खाऊंगा ना खाने दूंगा असे सांगणाऱया मोदीबाबाचं खाणंही वेगळं आहे. तो खात नाही म्हणजे भ्रष्टाचार करत नाही हे सर्टिफिकेट मी देतो; पण तो दुसऱयांना खिलवतो आणि खिलवून झालं की त्यांना म्हणतो की अर्धं मला’, असा जोरदार हल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.

प्रकाश आंबेडकर येथे आज अकोला येथे जाहीर सभा झाली. तसेच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदी भ्रष्टाचारी आहेत की नाहीत याबाबत त्यांनी भाष्य केले. “नरेंद्र मोदी घोषणा करतात की ना खाऊंगा, ना खाने दुंगा. त्यांनी बायको सोडून दिली, मुलंही नाहीत. मग कोणासाठी कमावणार? आपल्यालाही खरं वाटतं, एकटा माणूस कमवणार कोणासाठी? आगे पिछे कोणीच नाहीय. म्हणून आपल्याला विश्वास वाटतो की, बाबा खरं बोलतो’’ अशी खिल्ली आंबेडकर यांनी उडवली.

भाजपला 150 वर जागा मिळणार नाहीत
लोकसभा निवडणुकीत भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असे भाकीतही प्रकाश आंबेडकर यांनी केले. मोदींना हरवायचे असेल तर जागावाटपात न अडकता सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. भाजप व आरएसएस हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहोत असे म्हणतात; मग देशात बहुसंख्य हिंदू असताना धार्मिक राजकारण कशासाठी याचा खुलासा होत नाही, असे आंबेडकर म्हणाले.

लोकशाहीसोबतच संविधान वाचवण्यासाठी मी माझे मत भाजपविरोधात टाकणार असे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. तसा प्रचार गल्लोगल्ली, चौकाचौकात जाऊन करायला हवा.
व्यापाऱयांना माझे सांगणे आहे, सध्या धाडी घालण्यासाठी राजकीय नेत्यांचा नंबर लागला आहे. मोदी परत सत्तेत आल्यास पुढचा नंबर तुमचा आहे. ईडी तुमच्या बोकांडी बसेल.
– प्रकाश आंबेडकर