प्रणव मुखर्जी नानाजी देशमुख, भूपेन हजारिका यांना ‘भारतरत्न’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच दिवंगत ज्येष्ठ गायक, संगीतकार भूपेन हजारिका आणि जनसंघाचे दिवंगत नेते, थोर समाजसेवक नानाजी देशमुख यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनातून या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले प्रणव मुखर्जी 2012 ते 2017 या काळात राष्ट्रपती होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले तेव्हा ते राष्ट्रपतीपदावर होते. तत्पूर्वी 50 वर्षे ते सक्रिय राजकारणात होते. देशाचे अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्रीपदासह अनेक महत्त्वाची खाती प्रणव मुखर्जी यांनी सांभाळली. हिंदुस्थानी राजकारणातील ‘स्टेटसमन’ म्हणून ते ओळखले जातात. गेल्या वर्षी प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला नागपूर येथे हजेरी लावली होती. तेथेही त्यांनी आपले स्पष्ट विचार मांडले होते. त्यांचा दीर्घ राजकीय कारकीर्दीचा गौरव सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्काराने करण्यात आला आहे.

नानाजी देशमुख यांचा जन्म परभणी जिल्हय़ातील कडोली येथे 11 ऑक्टोबर 1919 रोजी झाला. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले नानाजी हे पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांचे निकटवर्तीय होते. डॉ. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, चरणसिंग यांचे ते निकटवर्तीय होते.

ज्येष्ठ गायक, संगीतकार पहाडी आवाजाचे ज्येष्ठ गायक भूपेन हजारिका यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 रोजी आसाममध्ये झाला. गायक, संगीतकार, गीतकार, कवी असलेले हजारिका यांनी आसामी, बंगाली आणि हिंदी भाषेत शेकडो गाणी गायली आणि संगीतबद्ध केली होती. ‘रुदाली’ चित्रपटातील ‘दिल हुम हुम करे’ हे त्यांचे गाणे आजही लोकांच्या मनात रुंजी घालते.

पद्मपुरस्कार
पद्मविभूषण – लोककलावंत तीजन बाई, लार्सन ऍण्ड टुब्रोचे चेअरमन अनिलकुमार नाईक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.
पद्मभूषण – डॉ. अशोक कुकडे, बुद्धादीप मुखर्जी, ज्येष्ठ अभिनेता मोहनलाल, पत्रकार कुलदीप नय्यर, गिर्यारोहक बचेंद्री पाल.
पद्मश्री – अभिनेता मनोज वाजपेयी, फुटबॉलपटू सुनील छेत्री, अभिनेता दिनयार कॉन्ट्रक्टर, नृत्य दिग्दर्शक प्रभू देवा, क्रिकेटपटू गौतम गंभीर, संशोधक रोहिणी गोडबोले, नाटय़ दिग्दर्शक वामन केंद्रे, दिवंगत अभिनेते कादर खान, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत रवींद्र आणि स्मिता कोल्हे, सुदाम काटे, गायक शंकर महादेवन, कुस्तीपटू बजरंग पुनिया, प्राणीमित्र शतबीर सय्यद.

बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार हा देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. दिग्दर्शक वामन केंद्रे, अभिनेता मनोज वाजपेयी, प्रभूदेवा आदी ‘पद्म’ पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये 4 ‘पद्मविभूषण’, 14 ‘पद्मभूषण’ आणि 94 ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासकांचा हा गौरव असून त्यांच्याबद्दल व्यक्त केलेले हे प्रेम आहे, अशी प्रतिक्रिया बाबासाहेबांनी व्यक्त केली आहे.