
>> प्रशांत गौतम
‘तुमची आमची माय’ हे इंद्रजित भालेराव यांचे पुस्तक. छत्रपती संभाजीनगर येथील आदित्य प्रकाशनाने हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. ‘माझी माय’, ‘आमची माय’ आणि ‘तुमची माय’ असे तीन भाग पुस्तकात आहेत. पहिल्या भागात इंद्रजित भालेराव यांचे ‘माझी माय’ या आशयाचे बारा लेख आहेत. दुसऱया भागात ‘आमची माय’ या भागात 10 आप्तेष्टांचे लेख आहेत. यात जवळपास घरातील आणि महानुभाव आश्रमातील महंतांचे 10 अप्रतिम लेख आहेत आणि तिसऱया भागात म्हणजे ‘तुमची माय’ या शेवटच्या भागात नऊ लेख आहेत. या शेवटच्या भागात वि. शं. गौतम, शंतनू गौतम, श्रीकांत देशमुख, श्रीकांत उमरीकर, प्रकाश अंभोरे, बालाजी काळे, महेश मोरे, एकनाथ पगार आणि आर. आर. पाटील यांचे लेख आहेत. दीर भायापासून वेगळं निघाल्यावर ‘ती’ म्हणजे भालेराव सरांची आई आपल्या मुलांना शिकवण्याची जिद्द धरते. एकाला कवी, लेखक तर एकाला शास्त्रज्ञ बनवते. आपल्या चारही लेकी खात्यापित्या घरी पडाव्यात अशी व्यवस्था करते. सगळ्या लेकी, सुनांची पंचविसेक बाळंतपणं करून सगळी सांसारिक कर्तृत्वं पार पाडून सुखाने आराम करण्याऐवजी आई सन्यास घेऊन नव्या आश्रम व्यवस्थेत प्रवेश करते. या प्रवेशाने ती कुणा एकाची आई न राहता विश्वाची आई होते. महानुभाव जगण्याची ही शैली केवळ पंथातच मिळते. इंद्रजितच्या आईच्या चेहऱयावरील हे आत्मिक समाधानाचे तेज अनेकांनी पाहिलंय. समाधानाने जगून चटका लावून जाण्यातच स्वर्ग असावा.भालेरावांची आई खरोखर मित्रपरिवाराची माय होती.
आपल्या मुलाने चारचौघांत समृद्ध जगावं हे बाबांचं स्वप्न होतं. येणारे जाणारे, जवळचे आणि परिघातले आपल्या मुलावर निर्मोही प्रेम करताहेत हे आईबाबांसाठी खूप मोठं समाधान देणारं वास्तव होतं हे कुणीच नाकारू शकत नाही.



























































