
राजकारणातील रणकितीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रशांत किशोर यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
लवकरच पंजाब व उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. तसेच 2024 ला देशात लोकसभा निवडणूका आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी गांधी कुटुंबीयांची भेट घेतली. 2024 च्या लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसला तयार करण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांना दिली असल्याचे बोलले जात आहे.
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत प्रशांत किशोर यांनी तृणमूल काँग्रेससाठी रणनीती आखली होती. त्या निवडणूकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला होता.



























































