विरोधकांचे नेतृत्व हा काही काँग्रेसचा दैवी अधिकार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prashant-kishore

काँग्रेसप्रणीत यूपीएचे अस्तित्व आहेच कुठे, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी काँग्रेसला डिवचले. त्यानंतर आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्व हा काही कॉँग्रेसमधील एखाद्या व्यक्तीचा दैवी अधिकार नाही, विराधी पक्षाचे नेतृत्व लोकशाही पद्धतीने ठरवू द्या, असं म्हणत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.

काँग्रेस ज्या विचार आणि आणि जागेचे प्रतिनिधित्व करते ते मजबूत विरोधी पक्षासाठी आवश्यक आहे. परंतु काँग्रेसचे नेतृत्व हा एखाद्या व्यक्तीचा दैवी अधिकार नाही. विशेषतः अशा परिस्थितीत जेव्हा पक्ष गेल्या 10 वर्षांत 90 टक्कांपेक्षा जास्त निवडणुका हरला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे नेतृत्व लोकशाही पद्धतीने ठरवू द्या, असं ट्विट करत प्रशांत किशोर यांनी विरोधकांच्या नेतृत्वाच्या मुद्दय़ावरून कॉँग्रेसवर निशाणा साधला आहे.

आता विरोधकांनी एकजूट दाखवण्याची वेळ – सिब्बल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. काँग्रेसशिवाय यूपीए म्हणजे आत्म्याशिवाय शरीर अशी अवस्था होईल. आता विरोधकांनी एकजूट दाखवण्याची वेळ आहे, असे ट्विट सिब्बल यांनी केले आहे.

राजकारणाचा अजेंडा व्यावसायिकाने ठरवू नये!

वैचारिक बांधिलकी नसलेल्या व्यावसायिकास पक्ष पिंवा व्यक्तींना निवडणूक कशी लढवायची याबद्दल सल्ला देण्यास मोकळी आहे. परंतु तो आमच्या राजकारणाचा अजेंडा ठरवू शकत नाही, असा टोला कॉँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी प्रशांत किशोर यांना लगावला आहे. यूपीएचा भाग नसलेल्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्याने यूपीए अस्तित्वात नसल्याचा दावा करणे हास्यास्पद असल्याचे सांगत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.