
निवडणुकीचे रणनीतीकार प्रशांत किशोर हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीत मदत करणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे.
प्रशांत किशोर यांची I-Pac कंपनी राजकीय पक्षांच्या निवडणुकीचे व्यवस्थापन आणि रणनीती ठरवत असते. प्रशांत किशोर यांच्या निवडणूक व्यवस्थापनाचा रेकॉर्ड चांगलाच आहे. 2014 साली गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी बसवण्यात प्रशांत किशोर यांनी कळीची भुमिका निभावली होती. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत अपवाद उत्तर प्रदेशची किशोर यांनी यश मिळवले आहे.
Happy to share that @indianpac is coming on-board with us. Welcome aboard!
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 14, 2019
दिल्लीत पुढच्या वर्षी विधासनसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या व्यवस्थापन आणि रणनीतीसाठी प्रशांत किशोर हे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी काम करणार आहेत. केजरीवाल यांनी ट्विट करून प्रशांत किशोर यांचे स्वागत केले आहे.
उत्तर प्रदेश सोडून सर्व ठिकाणी यश
2014 साली प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी काम केले होते. मोदींना पंतप्रधान बनवण्यात प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भुमिका बजावली होती. नंतर वर्षभरातच किशोर यांनी भाजपची फारकत घेत नितीश कुमार यांची मदत केली. नितीश कुमार आणि लालू यादव यांची युती करण्यात किशोर यांचा हात होता.
2017 साली किशोर यांनी पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची साथ दिली होती. उत्तर प्रदेशमध्ये किशोर यांना फारसे यश नाही मिळाले. परंतु पंजाबमध्ये काँग्रेस जिंकून कॅ. अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
उत्तरेतच नाही तर दक्षिणेतही प्रशांत किशोर यांनी आपली चुणुक दाखवली. आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डी यांच्या व्हायएसआर काँग्रेससाठी काम केले. 2019 च्या निवडणुकीत जगमोहन रेड्डी जिंकले आणि मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.
























































