कोरोना महामारीच्या काळात ‘अशी’ करा पैशांची बचत…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे आगामी काळातील अस्थिरता आणि अनिश्चिततेचा विचार करून प्रत्येकाने पैशांची बचत करणे गरजेचे आहे. कोरोना संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. तर अनेकांच्या पगारात कपात झाली आहे. त्यामुळे आतापासूनच पैशांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

वायफळ किंवा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी महिन्याच्या खर्चाचे नियोजन करून गरज असेल तेवढीच रोख रक्कम जवळ बाळगावी. अन्यथा सर्व पैसे खर्च होण्याची शक्यता असते. खर्चाचे नियोजन केल्यास महिन्याचा खर्च नियंत्रित होईल आणि अनावश्यक खर्चाला चाप लागेल. संकटाच्या काळात दीर्घ मुदतीची गुंतवणूक करणे कठीण असते. संकटाच्या काळात कोणत्याही क्षणी पैशांची गरज भासू शकते. त्यामुळे अल्प मुदतीसाठीची गुतंवणूक किंवा म्युच्युअल फंड किंवा अल्प काळाच्या मुदत ठेवीचा पर्याय निवडावा. तसेच पीपीएफ किंवा पूर्वी केलेल्या दीर्घ मुदतठेवी तशाच ठेवाव्या. गरजेचेवेळी तो पैसा उपयोगास येतो.

पगार कपात झाल्याने अनेकांना कर्जाचे हप्ते कसे फेडावे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे कर्ज घेताना त्याचा ईएमआय आणि तो फेडताना बचतीवर होणारा परिणाम, याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे कर्ज घेताना या बाबींचा विचार करावा. आता पगारकपात झाल्यामुळे बँकेशी संपर्क साधून ईएमआयची रक्कम किंवा हप्ता कमी करण्याबाबतच्या योजनांची माहिती घ्यावी किंवा काही महिने ईएमआय भरण्यास सूट मिळण्याचा पर्याय आहे का, याबाबतची माहिती घ्यावी. सध्या क्रेडिट कार्डचा वापर वाढला आहे. मात्र, क्रेडिट कार्डच्या अतिवापरामुळे आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते. क्रेडिट कार्डची थकबाकी शिल्लक राहिल्यास त्यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज लावले जाते. त्यामुळे आपली थकबाकी शिल्लक असल्यास ती लवकरात लवकर भरण्याकडे लक्ष द्यावे.

सध्याच्या अस्थिरतेच्या काळात टर्म विमा किंवा आरोग्य विमा काढणे गरजेचे आहे. अनेकदा गुतंवणूक करताना भविष्यातील गरजा लक्षात घेत गुंतवणूक केली जाते. मात्र, विम्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे विम्याच्या गुतंवणुकीकडे लक्ष द्यावे. त्यामुळे अस्थिरतेच्या काळात आपल्याला आणि कुटुंबियांना सुरक्षा कवच उपलब्ध होईल. बचतीसाठी या मार्गांचा वापर केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल. तसेच कोरोना संकटाच्या काळातून महत्त्वाचा धडा घेतला पाहिजे. गुतंवणूक करताना आपत्कालीन गरजांसाठी काही रक्कम वेगळी काढल्यास अशा संकटांचा सामना करताना अडचणी कमी होणार आहेत.