
शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून, सार्वजनिक मंडळ, देवस्थाने आणि घरोघरी जय्यत तयारी सुरू झाली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अख्यत्यारीतील तीन हजारांहून अधिक मंदिरांतील तयारी पूर्णत्वास आली आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ आहे, तर म्हैसूर पाठोपाठ येथील शाही दसरा सोहळा जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील नवरात्रोत्सव सोहळ्याला धार्मिक व ऐतिहासिक अशी वैभवशाली परंपरा आहे. यंदाही नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, श्री अंबाबाई, श्री जोतिबा या प्रमुख मंदिरांसह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीअंतर्गत तीन हजारांहून अधिक मंदिरांतील स्वच्छता, रंगरंगोटीसह देवतांचे दागिने पॉलिश, दर्शन मंडप आदी कामे पूर्ण झाली आहेत. सध्या मंदिरांवरील विद्युत रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात आहे.
दरम्यान, मूर्तिकारांच्या हाताला आता वेग आला असून, अनेक सार्वजनिक मंडळांच्या दुर्गामूर्ती तयार झाल्या आहेत. मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. तसेच अनेक मंदिरे आणि गडकोट किल्ल्यांवरून दुर्गा ज्योत घेऊन जाणाऱया मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.
देवीची उत्सवमूर्ती पंरपरेनुसार सदरेवर विराजमान होणार?
नवरात्रोत्सवापूर्वी श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे काम पूर्ण करू, असे सांगणाऱयांचा दावा सपशेल फोल ठरला आहे. परिणामी यंदा प्रथमच देवीची उत्सवमूर्ती परंपरेनुसार सदरेवर विराजमान होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, याबाबत भाविकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली असून, याकडे लक्ष लागले आहे.
औंधमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामनिवासिनी, मूळपीठ निवासिनी श्री यमाईदेवी व राजवाडय़ातील कराडदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री यमाईदेवी देवस्थानच्या चिफ ट्रस्टी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
रविवार, दि. 15 रोजी येथील राजवाडय़ातील कराडदेवी येथे देवीची मखरात प्रतिष्ठापना श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते होणार आहे. दि. 16 ते 24 ऑक्टोबरपर्यंत नियमित सकाळी व रात्री महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली होणार आहे. दि. 22 रोजी पूजा झाल्यानंतर मूळपीठ डोंगरावर देवीची यात्रा भरविली जाणार आहे. यावेळी हरिजागर, श्री यमाई देवीची पालखीतून मिरवणूक व पूजा, आरती केली जाणार आहे.
दि. 23 रोजी देवी उत्थापना, घटउत्पाथना, कुमार-कुमारी पूजन केले जाणार आहे. दि. 24 रोजी विजयादशमी उत्सवानिमित्त राजवाडय़ात शस्त्र्ापूजन केले जाणार आहे. सायंकाळी सीमोल्लंघन मिरवणूक निघणार असून, पालखी परत देवळात आणून गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते मानकऱयांना सोने देण्याचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार, दि. 25 रोजी लळिताचे कीर्तन, आरती, जोगवा मागून श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते मानकऱयांना नारळ, बिदाग्या देऊन गुलाल उधळून उत्सवाची सांगता होणार आहे.
























































