खेळता खेळता अडीच वर्षाचा मुलगा रुळावर आला आणि…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
child survive

सामना प्रतिनिधी । पणजी

रेल्वे चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अचानक रेल्वे रुळावर आलेल्या अडीच वर्षाच्या बालकाचा जीव वाचला. पेडणे ते कारवार मार्गावर धावणार्‍या रेल्वेसमोर अचानक एक बालक आल्याचे पाहून रेल्वे चालक सुरेश कुमार यांनी तात्काळ ब्रेक लावल्यामुळे त्या चिमुकल्याचे प्राण वाचले. ही घटना सोमवारी दुपारी बाळ्ळी रेल्वे स्थानकाजवळ घडली.

या बालकाचे आई-वडील देऊळवाडा बाळ्ळी येथे अविनाश फळदेसाई यांच्याकडे भाड्याने राहतात. मुलाच्या आईचे नाव नाजू खातून तर वडिलांचे नाव महम्मद सय्यद आहे. हे कुटुंब मूळ बिहार येथील आहे. कुंकळ्ळी पोलीस उपनिरीक्षक महेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबाचे घर बाळ्ळी रेल्वे स्थानकाजवळ आहे. हा छोटा मुलगा खेळता-खेळता रेल्वे रुळावर पोहचला होता. परत येण्यासाठी त्याला वाट न सपाडल्याने तो रेल्वे रुळावर आला होता. त्याच दरम्यान, कारवारवरून पेडणेच्या दिशेने रेल्वे येत होती. अचानक हा मुलगा रेल्वेसमोर आल्याने चालक सुरेश कुमार यांनी आपत्कालीन ब्रेक दाबला. त्यामुळे गाडी तात्काळ थांबली, अन्यथा त्या बालकाच्या जीवावर बेतले असते.